गेल्या अनेक दिवसांपासून साठा शिल्लक नाही

गेल्या अनेक दिवसांपासून साठा शिल्लक नाही

Published on

‘आपला दवाखाना’मध्ये कफ सिरपचा तुटवडा

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : पालिकेच्या आपला दवाखान्यात सध्या कफ सिरपचा तुटवडा जाणवत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यापासून दवाखान्यात कफ सिरपचा साठा संपला आहे. दवाखान्यात उपलब्ध असलेल्या सर्वांत सामान्य औषधांपैकी हे एक आहे; पण सध्या रुग्णांना फक्त गोळ्या दिल्या जात आहेत.
याबाबत विचारणा करण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाचे उपायुक्त शरद उघाडे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही. हवामानातील चढ-उताराचा मुंबईकरांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. नागरिकांमध्ये सर्दी, खोकला आणि तापाची समस्या वाढली आहे. पश्चिम उपनगरातील एका दवाखान्यात उपचारासाठी गेलेल्या स्वाती यांनी सांगितले, मला सर्दी आणि ताप आहे. तापावरील गोळ्या मिळाल्या; पण या वेळी खोकल्याचे सिरप उपलब्ध नव्हते. फार्मासिस्टने सांगितले की सिरपचा साठा संपला आहे. ‘सकाळ’ने स्वतः तपासलेल्या मध्य मुंबई, दक्षिण मुंबई आणि पूर्व उपनगरातील अनेक दवाखान्यांमध्ये सिरपचा साठा संपल्याचे आढळले. दरम्यान, मुंबईतील एका आपला दवाखान्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले, की कफ सिरप आहेत; पण खूप जास्त साठा नाही. २५ टक्के कफ सिरप ठेवावे लागतात, त्यामुळे साठा कमी असतो.

Marathi News Esakal
www.esakal.com