ठाणे होणार पार्क सिटी

ठाणे होणार पार्क सिटी

Published on

ठाणे होणार पार्क सिटी
व्हिविंग टॉवर, कन्व्हेन्शन सेंटर, टाऊन पार्क; पालिका निवडणुकांच्या तोंडावर घोषणा
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १६ : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा होताच ठाण्यात होऊ घातलेल्या हजारो कोटींच्या प्रकल्पांचा वर्षाव करण्यात आला आहे. त्यात कासारवडवली येथील खाडीकिनारी व्हिविंग टॉवर आणि कन्व्हेन्शन सेंटर पार्क, कोलशेत येथे टाऊन पार्कचा समावेश आहे. विशेष म्हणजे, गेल्या निवडणुकीत घोषणा झालेल्या आणि अद्यापि कागदावर असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्नो पार्क, अ‍ॅमेझॉन पार्क, अ‍ॅडव्हेंचर पार्क, पक्षी संग्रहालय, मत्स्यालय आदी जुन्या प्रकल्पांना नवीन फोडणीही देण्यात आली आहे. निवडणुकीच्या तोंडावर घोषणा झालेले हे प्रकल्प प्रत्यक्षात झाले तर येत्या काळात ठाणे पार्क सिटी म्हणून ओळखली जाणार आहे.

मुंबई, ठाण्यासह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिकांचाही यामध्ये समावेश आहे. या सहापैकी ठाणे महापालिका ही अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते. त्यामुळे निवडणुकीची घोषणा होण्यादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील विकासाला गती देणाऱ्या प्रकल्पांची माहिती दिली. मुंबईपाठोपाठ ठाण्यातील हायटेक प्रकल्पही त्यांनी घोषित केले. या पत्रकार परिषदेस मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे आर्किटेक्ट हफीज कॉन्ट्रॅक्टर उपस्थित होते.

ठाणे शहरातील कासारवडवली खाडीकिनारी येथील ५० एकर जागेत मंगल कलशाच्या संकल्पनेनुसार २६० मीटर उंचीचा देशातील सर्वात मोठा टॉवर आयफेल टॉवरच्या धर्तीवर उभारण्यात येत आहे. विशेष म्हणजे, आयफेल टॉवरची उंची ही ३०० मीटर आहे. याठिकाणी व्हिविंग टॉवर आणि कन्व्हेक्शन सेंटर यांचा समावेश असणार आहे. हे काम हफीज कॉन्ट्रॅक्टर यांच्या संकल्पनेनुसार डिझाइन करण्यात आले आहे. हा टॉवर झाल्यास जागतिक पातळीवर ठाण्याचे नाव उंच होणार आहे. कोलशेत येथे २५ एकर जागेवर बीओटी तत्त्वावर टाऊन पार्क उभारण्यात येणार आहे. या टाऊन पार्कमध्ये आगरी-कोळी संग्रहालय, विज्ञान सेंटर, मत्स्यालय आणि क्रीडा संकुल यांचा समावेश असणार आहे. तळ अधिक एक मजली एलिव्हेटेड उद्यान हे या प्रकल्पाचे वैशिष्ट्य असणार आहे.

पक्षी संग्रहालयासाठी १० कोटींचा निधी
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले कोलशेत येथील आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्नो पार्क, अ‍ॅम्युझमेंट पार्क, अ‍ॅडव्हेंचर पार्क आदी जुन्या प्रकल्पांची आठवणही निवडणुकीच्या तोंडावर झाली आहे. यातील स्नो पार्क आणि अ‍ॅम्युझमेंट पार्क २५ एकरच्या जागेत उभारण्यात येणार आहे. तर कोलशेत येथे १२.५ एकर जागेत पक्षी संग्रहालय उभारण्यासाठी राज्य शासनाकडून १० कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे.

स्पोर्ट्स कॉम्लेक्स, हरित पट्टा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०३६च्या ऑलिंपिकच्या तयारीचा भाग म्हणून ५० एकर जागेत स्पोर्ट अरेना उभारण्यात येणार आहे. तर २५ एकर जागेत म्युझिकल कॉन्सर्ट तयार करण्याचे प्रस्तावित आहे. विविध प्रकल्प राबवत असताना ठाण्याची हिरवाई बहरावी, यासाठी ठाणे महापालिकेकडून मिरा-भाईंदर महापालिकेच्या सीमेलगत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाशी जोडून १८.४ किमी लांबीचा आनंदवन हरित पट्टा विकसित केला जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com