शिवसेनेसमोर मनसेचे कडवे आव्हान!
शिवसेनेसमोर मनसेचे कडवे आव्हान!
माहीम-प्रभादेवीचा गड राखण्यासाठी रणनीती सुरू
मिलिंद तांबे ः ंसकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : माहीम-प्रभादेवी मतदारसंघात येणारा प्रभाग क्रमांक १९४ मध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाचे नगरसेवक असले तरी आपला जुना गड पुन्हा मिळवण्यासाठी मनसे सज्ज झाली आहे. प्रभादेवी, माहीमचा किल्ला लढवण्याची जबाबदारी यशवंत किल्लेदार यांच्यावर सोपवण्याचा तयारीत मनसे असून, ते समाधान सरवणकर यांच्या ताब्यात असलेला प्रभाग पुन्हा हिसकावून ताब्यात घेतील, यासाठीची रणनीती मनसेकडून आखण्यात येत आहे.
२०१७ च्या महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १९४ मधून समाधान सरवणकर हे विजयी झाले होते. त्यांनी तेव्हा प्रबळ उमेदवार आणि विद्यमान आमदार महेश सावंत यांचा पराभव केला होता. महेश सावंत यांनी तेव्हा शिवसेना बंडखोर उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. सरवणकर यांनी मनसेचे तत्कालीन नगरसेवक संतोष धुरी यांचाही पराभव केला होता. त्यामुळे मनसेचा बालेकिल्ला ढासळला होता. तिथे पुन्हा धडक मारण्याचा प्रयत्न मनसे करणार आहे. आता मनसेला शिवसेना ठाकरे यांची सोबतदेखील मिळणार आहे. त्यामुळे त्यांची स्थिती मजबूत झाली असून, शिंदेसेनेसमोर त्यांनी कडवे आव्हान उभे केले आहे.
प्रभाग १९४ मधील एकूण लोकसंख्या ५८,१६० इतकी असून, त्यात एससी (अनुसूचित जाती) लोकसंख्या ५०९८, एसटी ३४३ अशी आहे. मुख्य भाग प्रभादेवी, शेठवाडी, आरपी नगर, भाटीया नगर यांचा समावेश आहे. येथे मराठी, गुजराती आणि मुस्लिम मतदारांची संख्या मोठी आहे. मराठी आणि मुस्लिम मते शिवसेना ठाकरे गट आणि मनसेकडे जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे त्यांचे पारडे जड असल्याचे मत राजकीय विश्लेषकांचे आहे.
या प्रभागातील मुख्य समस्या रस्त्यांची अपुरी दुरुस्ती ही आहे. विशेषतः अरुंद व जुन्या गल्ल्यांमध्ये खड्डे व असमान पृष्ठभागामुळे वाहतुकीची मोठी अडचण आहे. त्याचबरोबर पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने या भागात वारंवार पाणी साचते. या प्रभागात जुन्या चाळी व इमारतींची धोकादायक अवस्था असून, काही प्रकल्पांच्या पुनर्विकास प्रक्रियेत विलंब होत आहे.
प्रभादेवी, सेनापती बापट मार्गावर सायंकाळी गर्दी होते. यासह बेकायदेशीर पार्किंग आणि रस्त्यावर व्यापारी अतिक्रमणामुळे पादचाऱ्यांची गैरसाेय होते. कचरा व्यवस्थापनातील त्रुटी, काही विभागांत कचरा वेळेवर न उचलला जाण्याच्या तक्रारी, सार्वजनिक शौचालयांची कमतरता आणि विद्यमान शौचालयांची अपुरी देखभाल, ड्रेनेज लाइन वारंवार जाम होणे, पिण्याच्या पाण्याचा दाब कमी, उद्यान व मोकळ्या जागांची कमतरता या प्रमुख समस्या आहेत.
लोकसभा, विधानसभेतील चित्र
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे अरविंद सावंत यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राहुल शेवाळे यांचा अटीतटीच्या शर्यतीत पराभव केला होता, तर विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचा पराभव केला. त्यामुळे सध्या या प्रभागात महाविकास आघाडीचे पारडे जड असल्याचे दिसते.
२०१७ महापालिका निवडणूक निकाल
समाधान सदानंद सरवणकर
- शिवसेना, ८,६२३ मते : विजेता
महेश बळीराम सावंत
-अपक्ष ८,३६४ मते
संतोष बालकृष्ण धुरी
- मनसे ः ६,६८४ मते
पराभवाचा फरक : २५९ मते
आमच्या भागात पावसाळा आला की गल्लीबोळात पाणी साचते. प्रभागात काही कामे झाली असतली तरी अजूनही बऱ्याच समस्या तशाच आहेत. या वेळी काम करणाऱ्यांनाच मते देणार.
- अमोल हळदे, मतदार
व्यवसायावर बेकायदेशीर पार्किंग आणि अतिक्रमणाचा थेट परिणाम होतो. ग्राहकांना येणे-जाणे कठीण होते. अनेकदा तक्रारी देऊनही ठोस कारवाई होत नाही. निवडणुकीत सगळे येऊन आश्वासने देतात. या वेळी काम करणाऱ्या उमेदवाराला निवडून देणार.
- जयेश गांधी, मतदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

