नवी मुंबईत सत्तेच्या समीकरणांना वेग
नवी मुंबईत सत्तेच्या समीकरणांना वेग
महापालिका निवडणूक जाहीर होताच राजकीय हालचालींना उधाण
वाशी, ता. १६ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकांची अधिकृत घोषणा होताच शहरातील राजकीय वातावरण तापले असून सत्तेच्या समीकरणांना वेग आला आहे. निवडणुकांचे बिगुल वाजताच सर्वच राजकीय पक्षांनी आपापली रणनीती आखण्यास सुरुवात केली असून, आगामी निवडणूक अत्यंत चुरशीची ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राज्यपातळीवर महायुती होण्याची चर्चा सुरू असली, तरी नवी मुंबईत भाजपचे नेते व राज्याचे वनमंत्री गणेश नाईक आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात मनोमिलन होणार की थेट सामना रंगणार, याकडे नवी मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.
भाजपकडून गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचे संकेत देण्यात आले असून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीही सुरू झाल्या आहेत. शहराच्या राजकारणात गणेश नाईक हे प्रभावी व अनुभवी नेते मानले जातात. त्यामुळे भाजपने संघटनात्मक बांधणीला गती दिली आहे; मात्र महायुतीतील शिवसेना (शिंदे गट) व भाजपमधील मतभेद उघडपणे समोर येत असल्याने अंतिम निर्णय काय होणार, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे महाविकास आघाडीत हालचालींना वेग आला आहे. ठाकरे गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्यात आघाडीबाबत सकारात्मक चर्चा सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. विशेषतः ठाकरे गट व मनसे यांच्यातील जवळीक वाढल्याची चर्चा असून, ही आघाडी प्रत्यक्षात आल्यास नवी मुंबईतील राजकीय गणिते बदलू शकतात. नवी मुंबईत महायुती झाली, तर अनेक इच्छुक उमेदवारांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता असून अशा नाराज गटांकडून अपक्ष उमेदवारीचा पर्याय गांभीर्याने विचारात घेतला जात आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत पक्षांइतकीच व्यक्तिगत समीकरणेही महत्त्वाची ठरणार आहेत. विकासकामे, वाहतूक कोंडी, पर्यावरण, पायाभूत सुविधा आणि झोपडपट्टी पुनर्वसन हे प्रमुख निवडणूक मुद्दे असून, सत्तेची कास कोण लावते, याबाबत नवी मुंबईकर उत्सुकतेने वाट पाहत आहेत.
...........................
‘सांगली पॅटर्न’ची चर्चा
महायुती झाल्यास भाजप व शिवसेना (शिंदे गट) मधील अनेक इच्छुकांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे नाराज उमेदवार अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याची तयारी करत आहेत. खासदारकीच्या निवडणुकीत सांगलीतील विशाल पाटील अपक्ष म्हणून विजयी ठरले होते. त्याच धर्तीवर महापालिका निवडणुकीतही अपक्ष पॅनेलद्वारे ‘लढा, नडा, पाडा’ हे समीकरण आकार घेणार का, याबाबत मतदारांमध्ये उत्सुकता आहे.
..................
पालिकेचे २०१५चे पक्षीय बलाबल
शिवसेना - ३७
भाजप - ७
काँग्रेस - १०
राष्ट्रवादी काँग्रेस - ५२
अपक्ष - ५
एकूण जागा - १११
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

