माणगावमधील सैनिक विश्रांती गृह उपेक्षित

माणगावमधील सैनिक विश्रांती गृह उपेक्षित

Published on

माणगावमधील सैनिक विश्रांतिगृह उपेक्षित
निधीअभावी नूतनीकरण रखडले; धोकादायक अवस्थेत ऐतिहासिक इमारत
माणगाव, ता. १६ (वार्ताहर) : माणगाव शहराच्या मध्यवर्ती भागात, कचेरी रोडलगत विद्यानगरच्या प्रवेशद्वाराजवळ वसलेले सैनिक विश्रांतिगृह अक्षरशः अखेरची घटका मोजत आहे. स्वातंत्र्योत्तर काळातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या वास्तूकडे शासन व प्रशासनाचे दीर्घकाळापासून दुर्लक्ष झाल्याने ती पूर्णतः जीर्णावस्थेत पोहोचली असून, देशसेवेच्या प्रतीक असलेल्या या वास्तूच्या भवितव्याबाबत तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून या विश्रामगृहाची किमान डागडुजी किंवा नूतनीकरण करण्यात यावे, अशी मागणी माजी सैनिक, स्थानिक नागरिक व सामाजिक संघटनांकडून सातत्याने केली जात आहे, मात्र सैनिक कल्याण विभाग आणि संबंधित प्रशासकीय यंत्रणांमधील नियम, कागदोपत्री प्रक्रिया व विभागीय अडथळ्यांमुळे निधी रखडला असून, त्याचा फटका थेट या ऐतिहासिक इमारतीला बसत आहे.
एकेकाळी या विश्रामगृहात सैनिक व पोलिस भरतीसाठी तरुणांची मोठी गर्दी होत असे. विविध सामाजिक व प्रशासकीय सभा-बैठका येथे पार पडत, तर माजी सैनिक विश्रांतीसाठी येथे मुक्काम करत असत. आज मात्र तेच विश्रामगृह ओसाड, भयावह आणि उपेक्षित अवस्थेत उभे आहे.
दरवर्षी ९ जानेवारी रोजी देशातील पहिले व्हिक्टोरिया क्रॉस विजेते वीर यशवंतराव घाडगे यांच्या जयंतीनिमित्त लोकप्रतिनिधी व अधिकारी येथे भेट देतात. भाषणे होतात, आश्वासने दिली जातात; मात्र कार्यक्रम संपल्यानंतर पुन्हा या विश्रामगृहाच्या वाट्याला केवळ अंधार आणि दुर्लक्षच येते.
देशसेवेचे प्रतीक असलेल्या या वास्तूचे जतन व पुनरुज्जीवन होणे ही केवळ प्रशासकीयच नव्हे, तर समाजाचीही नैतिक जबाबदारी आहे. अन्यथा इतिहासात केवळ एवढीच नोंद राहील की, सैनिकांच्या सन्मानार्थ उभारलेले विश्रांतिगृह प्रशासनाच्या उदासीनतेमुळे काळाच्या पडद्याआड गेले.
चौकट
दुर्घटनेची भीती
सुमारे पाच वर्षांपूर्वी केवळ संरक्षण भिंती उभारण्यात आल्या, मात्र मूळ सैनिक विश्रांतिगृहाच्या नूतनीकरणाचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. आज इमारतीच्या परिसरात झाडे-झुडपे आणि गवत मोठ्या प्रमाणावर वाढले असून, भिंतींमधील दगड-विटा ढासळत आहेत. दरवाजे-खिडक्या मोडकळीस आले असून, छत व भिंती धोकादायक अवस्थेत पोहोचल्या आहेत. कोणत्याही क्षणी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com