प्रा. थोरात स्मृतीव्याख्यानमालेत ‘आता थांबायचं नाय’चा निर्धार

प्रा. थोरात स्मृतीव्याख्यानमालेत ‘आता थांबायचं नाय’चा निर्धार

Published on

प्रा. थोरात स्मृती व्याख्यानमालेत ‘आता थांबायचं नाय’चा निर्धार
समाजप्रबोधन, प्रेरणादायी उपक्रमांनी कार्यक्रम ठरला संस्मरणीय
जुईनगर, ता. १६ (बातमीदार) : नवी मुंबई वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात आयोजित प्रा. बी. आर. थोरात स्मृती व्याख्यानमालेच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचा यज्ञ उत्साहात पार पडला. या व्याख्यानमालेत २०२५ चा प्रतिष्ठित रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त डॉ. भरत वाटवानी यांनी १३ वे पुष्प गुंफले. त्यांच्या व्याख्यानाला विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
डॉ. वाटवानी यांनी कर्जत येथील श्रद्धा फाउंडेशनच्या माध्यमातून रस्त्यावरील मनोरुग्णांसाठी सुरू असलेले कार्य केवळ देशातच नव्हेतर आंतरराष्ट्रीय स्तरावर कसे विस्तारले आहे, याची माहिती उपस्थितांना दिली. समाजाचे आपण काही देणे लागतो, ही जाणीव ठेवून वंचित व उपेक्षित घटकांसाठी प्रत्येकाने आपल्या परीने योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. या वेळी प्रभात संस्थेच्या वतीने नाका कामगार व कचरा वेचक महिलांसाठी “आता थांबायचं नाय” या प्रेरणादायी चित्रपटाचा प्रीमियर शो आयोजित करण्यात आला. या चित्रपटातून प्रेरणा घेऊन उपस्थित कचरा वेचक महिलांनी यावर्षी दहावीची परीक्षा देण्याचा निर्धार व्यक्त केला. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत स्त्रीमुक्ती संघटना व प्रभात यांच्या संयुक्त विद्यमाने “आता थांबायचं नाय” हा अभ्यासवर्ग सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत १७ अर्जांपैकी १५ कचरा वेचक महिला यंदा दहावीची परीक्षा देणार आहेत. या विद्यार्थिनींना मोफत मार्गदर्शन करणाऱ्या अध्यापकांचा सन्मान बृहन्मुंबई महापालिकेचे निवृत्त उपायुक्त उदयकुमार शिरूरकर यांच्या हस्ते करण्यात आला. विशेष म्हणजे आता थांबायचं नाय, हा चित्रपट शिरूरकर यांच्या जीवनावर आधारित असल्याचे या वेळी स्पष्ट झाले.
कार्यक्रमात नवी मुंबईतील पहिले अवयवदाता कै. देवानंद मोहन शिंदे (देबू) यांच्या परिवाराचा अवयवदाता सन्मानाने गौरव करण्यात आला. तसेच अवयवदान क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी दोस्त मुंबई संस्थेचे संस्थापक डॉ. कैलास जवादे यांना ‘स्टार ऑफ द इयर’ सन्मान प्रदान करण्यात आला. प्रभात संस्थेच्या कै. प्रा. थोरात स्मृतिग्रंथालयाच्या माध्यमातून राज्यस्तरीय आदर्श ग्रंथपाल पुरस्कार सीकेटी कॉलेज, न्यू पनवेलचे ग्रंथपाल डॉ. रमाकांत नवघरे यांना देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com