ठाण्यात भाजप अस्वस्थ
ठाण्यात भाजप अस्वस्थ
पक्षवाढीची संधी हुकली
ठाणे काबीज करण्याचे स्वप्न धूसर
जागावाटपाच्या गणिताने पदाधिकारी अस्वस्थ
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १६ ः ठाणे आणि कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक शिवसेना शिंदे गट आणि भाजप महायुती म्हणून लढणार आहे. त्यासाठी जागावाटपाचे चर्चेचे गुऱ्हाळ सुरू झाले नसले तरी यामध्ये आपल्या वाटेला किती जागा येणार, हा प्रश्न आता भाजपच्या चमूला सतावू लागला आहे. थेट केंद्राचे पाठबळ असल्यामुळे जागावाटपात ठाण्यात आणि कल्याण-डोंबिवलीत शिवसेना शिंदे गट ६० ते ७० टक्के जागा आपल्या ताब्यात मिळवण्याची शक्यता आहे. त्यामुळे पदरी पडतील त्या जागा भाजपला लढवाव्या लागणार असून पक्षवाढीची संधी हुकल्याची हळहळ व्यक्त केली जात आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने आपली ताकद दाखवून दिली आहे. दिल्लीतील भाजपश्रेष्ठींना खूष ठेवण्यातही ते यशस्वी झाले आहेत. याचे फलित म्हणजे मुंबई, ठाण्यात स्वबळाचा नारा देणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांना बॅकफूटवर आणण्यात यश आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मनाप्रमाणे मुंबई आणि ठाण्यात महायुतीची घोषणा करण्याची नामुष्की भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर आली. धनुष्याच्या एका बाणाने शिंदे यांनी मित्रपक्षांतील विरोधकांनाच लक्ष्मण रेषा आखून दिली असल्याची चर्चा आहे. याचा थेट परिणामही आता दिसू लागला असून महापालिका निवडणुकांच्या माध्यमातून ठाणे पुन्हा काबीज करण्याचे भाजपचे स्वप्न त्यामुळे धुळीस मिळताना दिसत आहेत.
ठाणे जिल्ह्यात १८ पैकी सर्वाधिक १० आमदार भाजपचे आहेत. शहरी आणि ग्रामीण भागात भाजपची ताकद वाढत आहे. सर्वप्रथम अंबरनाथ, बदलापूर नगर परिषद काबीज करून संपूर्ण जिल्ह्यात कमळ फुलवण्याचे स्वप्न भाजपचे आहे. महापालिका निवडणूक ही उत्तम संधी त्यासाठी मानली जात होती. गेल्या निवडणुकांमध्ये ठाण्यात २३, कल्याण-डोंबिवलीत ४३, मिरा-भाईंदरमध्ये ६१, उल्हासनगरात २१, भिवंडीत १९ भाजपचे नगरसेवक निवडून आले होते. नवी मुंबईत भाजपचे केवळ सहा नगरसेवक होते; पण आता चित्र पालटले आहे. गणेश नाईक यांनी राष्ट्रवादीला जय महाराष्ट्र करून भाजप प्रवेश केल्यामुळे येथे पक्षाची ताकद वाढली आहे.
अशीच ताकद सर्वच महापालिकांमध्ये वाढवण्याचा प्रयत्न गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात सुरू होता. हा प्रयोग यशस्वी होत असताना एकनाथ शिंदे यांना ठाणे आंदण का दिले जात आहे, असा प्रश्न भाजपचे स्थानिक पदाधिकारीच नव्हे तर उमेदवारीची तयारी करून बसलेले इच्छुकही आता विचारू लागले आहेत.
कुठे, किती ताकद?
ठाणे
ठाण्यात शिवसेना शिंदे गटाकडे सध्याच्या घडीला ८५ माजी नगरसेवकांचे बळ आहे. भाजप येथे ५५ हून अधिक नगरसेवक निवडून आणण्याची संधी शोधत होती; पण कळवा, मुंब्य्रात या मनसुब्यांना सुरुंग लावण्यात शिंदे यशस्वी झाले. तसेच महायुतीच्या चर्चेमुळे शिंदे गटातून भाजपमध्ये होणारे पक्षप्रवेश रोखले. त्यामुळे सध्या नौपाडा, कोपरी, वागळेतील काही प्रभाग, घोडबंदर, उथळसर या परिसरातच भाजपची ताकद दिसते. त्यामुळे महायुतीच्या जागावाटपात समान हक्क मागण्याची इच्छा असूनही १३१ पैकी ४० ते ४५ जागाच भाजपच्या वाट्याला येण्याची चिन्हे दिसत आहेत.
कल्याण-डोंबिवली
कल्याण-डोंबिवलीत भाजपचे ४३ नगरसेवक निवडून आले होते. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या खेळीने ऑपरेशन लोटसअंतर्गत ही संख्या वाढण्याचा प्रयत्न झाला; पण आजच्या घडीला शिवसेना शिंदे गटाकडे ६० पेक्षा जास्त माजी नगरसेवक आहेत. येत्या काही दिवसांमध्ये ही संख्या आणखी वाढणार आहे. अशावेळी ५० टक्के जागेवर भाजपने केलेला दावा कितपत टिकतो, हे पाहावे लागणार आहे.
नवी मुंबई
नवी मुंबईत स्वतंत्र लढण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक ठाम आहेत; पण येथेही शिवसेना शिंदे गटाचे ४५ पेक्षा जास्त माजी नगरसेवक आहेत. त्यामुळे महायुती झाली तर शिंदे यांना झुकते माप येथे द्यावे लागणार आहे. मिरा-भाईंदरमध्येही महायुती शिवसेना शिंदे गटाच्याच पथ्यावर पडणार असल्याचे बोलले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

