समुद्रकिनाऱ्यावर ४२ बीच वॉर्डनची नेमणूक

समुद्रकिनाऱ्यावर ४२ बीच वॉर्डनची नेमणूक

Published on

समुद्रकिनाऱ्यावर ४२ बीच वॉर्डनची नेमणूक
रायगड पोलिसांकडून पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पाऊल
अलिबाग, ता. १६ (वार्ताहर) ः सध्या हिवाळी पर्यटन हंगाम सुरू झाला असून, पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या रायगडातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करीत आहेत. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी रायगड पोलिसांच्या मदतीने आता बीच वॉर्डनची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्ह्यातील विविध समुद्रकिनाऱ्यांवर तब्बल ४२ बीच वॉर्डन तैनात करण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील अलिबाग, वरसोली, किहीम, आवास, मांडवा, रेवदंडा, मुरूड, काशीद, दिघी सागरी, श्रीवर्धन, दिवेआगर या समुद्रकिनाऱ्यांवर बिच वॉर्डन नेमण्यात आले आहेत. त्यांना जिल्हा सुरक्षा शाखेमार्फत प्रशिक्षण व ओळखपत्र देण्यात आले आहे. प्रशिक्षित बीच वॉर्डन हे संबंधित पोलिस ठाण्याच्या नियंत्रणात काम करणार असून, ते दोन शिप्टमध्ये सकाळी ७ ते ११ वाजता आणि सायकांळी ३ ते ७ वाजतामध्ये काम करणार आहेत. समुद्रकिनारी येणाऱ्या पर्यटकांना कोणतीही अडचण किंवा समस्या उद्भवल्यास तत्काळ त्यांना मदत करण्यात येणार आहे. बीच वॉर्डन यांनी आपले कर्तव्य बजावत असताना स्थानिक पोलिसांशी समन्वय ठेवावा, अशा सूचना त्‍यांना करण्यात आल्या आहेत.
...................
चौकट :
बीच वार्डनची कर्तव्ये :
१. पर्यटकांना भरती-ओहोटीच्या वेळापत्रकबाबत त्यांना सतर्क करणे.
२. समुद्रकिनारी अचानक काही अपघात झाल्यास स्थानिक पोलिस ठाण्यात माहिती देऊन अपघातग्रस्तांना तत्काळ वैद्यकीय मदत पुरविणेसाठी प्रयत्न करणे.
३. समुद्रकिनारी चालणारे वॉटर स्पोर्ट्स आणि खाद्यविक्रेते यांच्याकडून पर्यटकांसोबत कोणताही गैरप्रकार होत असल्यास पोलिस प्रशासनास अवगत करणे.
४. पर्यटनाकरिता येणाऱ्या महिला व मुलींची छेडछाड होत असेल, तर दक्ष राहून तत्काळ त्यांना मदत करणे.
५. पर्यटकांच्या हरविलेल्या, सापडलेल्या सामानाची दखल घेऊन सदर ठिकाणी ड्युटी असणाऱ्या पोलिसांना माहिती देणे.
................
चौकट :
बीच वॉर्डन असलेले किनारे :
अलिबाग पोलिस ठाणे अंतर्गत अलिबाग - ६, वरसोली -५; दिघी सागरी अंतर्गत दिवेआगर (रुपनारायण मंदिर), भट्टी विभाग, दिवेआगर किनारा, एमटीडीसी, सावित्री पाखाडी, हनुमान पाखाडी, गोठणेश्वर मंदिर येथे प्रत्येकी एक; मुरूड पोलिस ठाणे अंतर्गत काशीद किनारा - ६, मुरूड किनारा -३; मांडवा पोलिस ठाणे अंतर्गत किहीम -३, मांडवा -३, आवास -३; श्रीवर्धन पोलिस ठाणे अंतर्गत जीवना बंदर -१, श्रीवर्धन फेस्टिव्हल किनारा -१, श्रीवर्धन मुख्य किनारा -२, आरवी किनारा -१, हरिहरेश्वर -१.
.............
चौकट :
पर्यटकांनीही सूचनांचे पालन करावे :
अनेक वेळा समुद्रकिनाऱ्यांवर आलेले पर्यटक बीच वॉर्डन आणि स्थानिक मच्छीमार बांधवांच्याही सूचनांकडे दुर्लक्ष करतात. त्यांना पाण्याचा अंदाज येत नाही आणि दुर्दैवी घटना घडतात. त्यामुळे पर्यटकांनीही सूचनांचे पालन करावे, असे आवाहन रायगड पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com