मतदानाच्या तयारीचा बट्ट्याबोळ
मतदानाच्या तयारीचा बट्ट्याबोळ
साहित्य खरेदी निविदा प्रक्रियेला मिळेना मुहूर्त
ठाणे, ता. १६ : राज्य निवडणूक आयोगाने ठाणे महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजवले असून येत्या १५ जानेवारीला मतदान पार पडणार आहे; मात्र निवडणुकीसाठी आवश्यक असणाऱ्या २७ ते २८ प्रकारच्या साहित्यांच्या खरेदीसाठी पालिकेच्या निवडणूक विभागाने अद्याप निविदा प्रक्रिया राबवलेली नाही. निवडणुका अवघ्या एक महिन्यावर आल्या असताना प्रशासकीय पातळीवर होत असलेल्या या विलंबामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे दालन सजवणे, मतदान केंद्रांवर मंडप टाकणे, टेबल, खुर्ची, गालिचा आणि इतर अत्यावश्यक साहित्यांची गरज भासते. या साहित्यांच्या खरेदीसाठी सुमारे ८ कोटी ५० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. आदर्श आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच ही प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र कार्यक्रम जाहीर होऊन २४ तास उलटले तरी निविदा प्रक्रियेला मुहूर्त मिळालेला नाही. तर ठाणे पालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, संबंधित कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. लवकरच साहित्यांच्या खरेदीसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल. अशी माहिती निवडणूक विभाग, सहाय्यक आयुक्त बाळू पिचड यांनी दिली.
''आडमुठे'' धोरण चर्चेत?
निवडणूक पारदर्शक होण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे, संगणक, स्टेशनरी, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी वाहनांची व्यवस्था अशा १२ प्रकारच्या अत्यावश्यक साधनसामुग्रीची खरेदी करणे गरजेचे आहे. मात्र, ही सर्व प्रक्रिया निवडणूक विभागातील एका लिपिकाच्या ''आडमुठ्या'' धोरणामुळे रखडली असल्याची चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे. यामुळे कामांच्या नियोजनावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
प्रशासकीय कामांचा वेग संथ
एककीकडे पालिकेचा अतिक्रमण विभाग शहरात राजकीय बॅनर आणि पोस्टर्सवर कारवाई करत आहे, तर दुसरीकडे निवडणूक विभागाची अंतर्गत तयारी संथ गतीने सुरू असल्याचे चित्र आहे. साहित्य खरेदीसाठी लागणारा वेळ आणि पुरवठादारांची निवड पाहता, ही प्रक्रिया तातडीने राबवण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

