भूमिपुत्रांच्या धडक मोर्चाला मनोज जरांगे पाटील यांचा ठाम पाठिंबा

भूमिपुत्रांच्या धडक मोर्चाला मनोज जरांगे पाटील यांचा ठाम पाठिंबा

Published on

भूमिपुत्रांच्या धडक मोर्चाला जरांगेंचा पाठिंबा
२२ डिसेंबरला नवी मुंबई विमानतळ नामकरणासाठी निर्णायक आंदोलन
पनवेल, ता. १६ (बातमीदार)ः भूमिपुत्रांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांनी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान येत्या २२ डिसेंबरला होणाऱ्या भूमिपुत्रांच्या धडक मोर्चाला मनोज जरांगे पाटील यांनी आपला पाठिंबा जाहीर केला. या वेळी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर उपस्थित होते.
भूमिपुत्रांचा हा लढा न्यायाचा आणि हक्कांचा आहे. त्यांच्या न्याय्य मागण्या पूर्ण होईपर्यंत हा संघर्ष सुरूच राहिला पाहिजे, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी मांडली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्व. दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी भूमिपुत्र अनेक वर्षांपासून सातत्याने संघर्ष करत आहेत. हा प्रश्न केवळ नावाचा नसून, प्रकल्पासाठी आपली जमीन देणाऱ्या भूमिपुत्रांच्या सन्मानाचा आणि त्यांच्या योगदानाच्या मान्यतेचा असल्याची भावना यामागे आहे. यासंदर्भात बाळ्यामामा यांनी केंद्र सरकारकडेही पाठपुरावा सुरू ठेवला आहे.

केंद्राचे लक्ष वेधू
केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, तसेच केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री किंजरापु राममोहन नायडू यांची भेट घेऊन भूमिपुत्रांची मागणी मांडण्यात आली आहे. लोकनेते स्व. दि. बा. पाटील साहेब यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे, या ऐतिहासिक व न्याय्य मागणीसाठी २२ डिसेंबरला भूमिपुत्रांचा धडक मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चाच्या माध्यमातून केंद्र सरकारचे लक्ष वेधून घेऊन भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी निर्णायक लढा उभारला जाणार आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com