वर्षभरात ३५ हजारांहून अधिक रुग्णांना मदत
३५ हजारांहून अधिक रुग्णांना मुख्यमंत्री निधीतून मदत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : गंभीर आजार, महागडे उपचार आणि हाताशी नसलेली आर्थिक क्षमता यामुळे अनेक कुटुंबांचे आयुष्य अडचणीत येते. अशा वेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी हा अनेकांसाठी आधार ठरतो. ६ डिसेंबर २०२४ ते ६ डिसेंबर २०२५ या कालावधीत राज्यातील ३५ हजार ३६२ रुग्णांना २९९ कोटी ४३ लाख ५२ हजार ४०० रुपये इतकी वैद्यकीय आर्थिक मदत देण्यात आली आहे.
कर्करोग, हृदयरोग, मूत्रपिंड विकार यांसारख्या गंभीर आजारांवरील उपचारांसाठी ही मदत निर्णायक ठरली आहे. पूर्वी निधी मिळवण्यासाठी मुंबईपर्यंत फेऱ्या माराव्या लागत असत. जिल्हा कक्षांची स्थापना झाल्याने आता रुग्णांना आपल्या जिल्ह्यातच अर्जप्रक्रिया पूर्ण करता येत आहे. वेळ, पैसा आणि मानसिक ताण कमी झाल्याने उपचार वेळेवर सुरू होण्यास मदत झाली आहे. या वर्षातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाला मिळालेले एफसीआरए प्रमाणपत्र होय. त्यामुळे परदेशातून थेट देणग्या स्वीकारण्याचा मार्ग खुला झाला असून, निधीची व्याप्ती वाढली आहे. याचबरोबर राज्यातील विविध आरोग्य योजनांचे एकत्रीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एकाच प्रणालीत पात्रता, कागदपत्रे आणि अर्जप्रक्रिया उपलब्ध झाल्याने गरजू रुग्णांची गैरसोय कमी होणार आहे. निधी, योजना आणि रुग्णालयांमधील समन्वय वाढल्याने मदत अधिक जलद मिळण्याची अपेक्षा आहे.
...
त्रिपक्षीय करार
महागड्या उपचारांचा खर्च झेपणार नाही, या भीतीने अनेक रुग्ण उपचार पुढे ढकलतात. ही दरी भरून काढण्यासाठी त्रिपक्षीय कराराची संकल्पना पुढे आणली जात आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष, कॉर्पोरेट कंपन्या, रुग्णालये आणि काही प्रमाणात रुग्णांचे योगदान अशा पद्धतीने उपचार सुलभ करण्याचा हा प्रयत्न आहे. आर्थिक अडचणीमुळे कोणाचाही उपचार थांबू नये, हा संकल्प या उपक्रमांतून प्रत्यक्षात उतरत असल्याचे चित्र सध्या राज्यभर दिसत आहे.

