शिवाजी पार्क मैदानासाठी रस्सीखेच
शिवाजी पार्क मैदानासाठी रस्सीखेच
मनसेसह दोन्ही शिवसेनेचे पालिकेकडे अर्ज
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : महापालिका निवडणुकांसाठीच्या जाहीर सभांसाठी शिवाजी पार्क मैदान मिळावे, यासाठी परवानगीसाठी आतापर्यंत तीन पक्षांचे अर्ज पालिकेकडे आले आहेत. यामध्ये शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गटासह मनसेने अर्ज केला असून ११, १२ व १३ जानेवारी या तारखांपैकी एक दिवस मिळावा, अशी मागणी या तिन्ही पक्षांनी केली आहे. त्यामुळे शिवाजी पार्क मैदानासाठी रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
मुंबई महापालिकेवर सत्ता काबीज करण्यासाठी सर्व पक्ष कामाला लागले आहेत. प्रचारासाठी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या जात आहेत. यापुढे चौकसभा, घरोघरी प्रचार आदी माध्यमातून उमेदवारांचा मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न राहणार आहे. शिवाय, प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मोठ्या सभांसाठी प्रत्येक पक्षांचे नियोजनही सुरू झाले आहे. यापूर्वी शिवसेना व मनसेच्या अनेक सभा शिवाजी पार्कवर गाजल्या आहेत. आता आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर सभांसाठी शिवाजी पार्क मैदान मिळावे, यासाठी शिवसेना (ठाकरे गट), मनसे व शिवसेना (शिंदे गट) या तिन्ही पक्षांनी पालिकेकडे अर्ज सादर केले आहेत. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात ११, १२ व १३ जानेवारी या तिन्ही तारखांपैकी एक तारीख मिळावी, यासाठी अर्जाद्वारे मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे या तिन्ही तारखांपैकी कोणत्या पक्षाला कोणत्या तारखेला परवानगी मिळते, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

