- ठाणे महापालिका प्रशासनाची माहिती

- ठाणे महापालिका प्रशासनाची माहिती

Published on

१६ लाख ४९ हजार मतदार, १,९४२ केंद्रे
ठाणे महापालिका प्रशासनाची माहिती

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १६ : ठाणे महापालिकेची निवडणूक प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक व शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन कामाला लागले आहे. आचारसंहिता लागू होताच निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. ३३ पॅनेलच्या १३१ जागांसाठी १६ लाख ४९ हजार ८६७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यासाठी पालिकेने एक हजार ९४२ मतदान केंद्रे उपलब्ध केली आहेत. बहुतेक सर्व मतदान केंद्रे तळमजल्यावर असतील याची खबरदारी पालिकेने घेतली असून, सुमारे १० हजार कर्मचारी त्यासाठी तैनात करण्यात येणार आहेत.
१५ जानेवारीला महापालिकेसाठी मतदान होणार आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक झाली. या वेळी निवडणूक कार्यक्रम आणि पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. महापालिका क्षेत्रात एकूण ३३ प्रभाग असून, १६ लाख ४९ हजार ८६७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये आठ लाख ६३ हजार ८७८ पुरुष, सात लाख ८५ हजार ८३० महिला, तर १५९ इतर मतदारांचा समावेश आहे. संपूर्ण शहरात १,९४२ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. निवडणुकीच्या दिवशी सुमारे ९,७१० अधिकारी-कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. याशिवाय २० टक्के राखीव कर्मचारीवर्गही उपलब्ध ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती निवडणूक विभागाचे उपायुक्त उमेश बिरारी यांनी दिली.

सुरक्षेवर भर
बैठकीत मतदान केंद्रांची तयारी, निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालये, वाहन व्यवस्थापन, ईव्हीएम यंत्रणा, वीजपुरवठा, सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही व वेबकास्टिंग, मतमोजणी केंद्रे व स्ट्राँग रूम्स आदी सर्व टप्प्यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. अतिसंवेदनशील मतदान केंद्रे व भागांमध्ये आवश्यकतेनुसार वेबकास्टिंग सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या.

दिव्यांगांसाठी व्हीलचेअर
मतदारांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी बहुतांश मतदान केंद्रे तळमजल्यावर ठेवण्याचे नियोजन करण्यात येत आहे. दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती या वेळी देण्यात आली.

Marathi News Esakal
www.esakal.com