लवासाप्रकरणी निर्णय राखीव
लवासाप्रकरणी निर्णय राखीव
याचिका फेटाळण्याचेही न्यायालयाचे संकेत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : पुण्यातील लवासाप्रकरणी पवार कुटुंबीयांविरोधात सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकेवरील युक्तिवाद मंगळवारी (ता. १६) पू्र्ण झाला. त्याची दखल घेऊन उच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला; मात्र न्यायालयाने ही याचिका फेटाळण्याचे संकेतही दिले.
दिवाणी अधिकारक्षेत्राचा वापर करून पोलिसांना फौजदारी प्रक्रिया संहितेंतर्गत (सीआरपीसी) प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्याचे आदेश न्यायालय देऊ शकते. अशाप्रकारची कोणतीही कायदेशीर तरतूद दाखवण्यात याचिकाकर्ते अपयशी ठरल्याचे निरीक्षणही मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठाने नमूद केले. तसेच यापूर्वी याचिका निकाली काढताना नोंदवलेल्या निरीक्षणांच्या आधारे गुन्हा दाखल करण्याचे आदेश देता येणार नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.
लवासा प्रकल्पाबाबत याचिकाकर्त्यांनी केलेले आरोप तत्त्वतः खरे असले, तरीही त्याला आव्हान देण्यास बराच विलंब केल्याचे निरीक्षण तत्कालीन मुख्य न्या. दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठाने २६ फेब्रुवारी २०२२ रोजी लवासा प्रकल्पाविरोधातील याचिका निकाली काढताना नोंदवले होते. लवासाबाबत केलेले आरोप योग्य असले तरीही कायद्यात केलेले बदल मात्र बेकायदा असल्याचे म्हणता येणार नाही. याचिकाकर्त्यांच्या आरोपानुसार, शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना लवासा प्रकल्पात स्वारस्य होते. प्रकल्पासाठी रीतसर निविदा प्रक्रिया राबवणे आवश्यक असताना, ती न केल्याचे अधोरेखित होत असल्याचे खंडपीठाने निकालात स्पष्ट केले.
---
नव्याने जनहित याचिका
या निकालाच्या निष्कर्षाचा आधार घेऊन लवासा येथे प्रकल्प बांधण्यासाठी दिलेल्या कथित बेकायदा परवानग्यांबद्दल शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश सीबीआयला देण्याची मागणी नानासाहेब जाधव यांनी नव्याने जनहित याचिकेतून केली आहे. कॅग आणि लोकायुक्तांनी दिलेल्या अहवालाकडेही दुर्लक्ष केले असून, त्यामुळे सरकारचे पाच ते दहा हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावाही याचिकाकर्त्यांनी केला. २०१८ मध्ये पुणे पोलिस आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीवर पौड पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले. पुढे २०२२ मध्ये पुणे ग्रमीण पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केल्यावरही काहीच कारवाई न झाल्याने शेवटी जनहित याचिका केल्याचा दावा जाधव यांनी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

