गॅंगस्टर सुभाषसिंग ठाकूरला अटक
कुख्यात गुन्हेगार ठाकूरला अटक
व्यावसायिक चाैहान हत्येप्रकरणी कारवाई; सात दिवस कोठडी
नालासोपारा, ता. १६ (बातमीदार) ः विरारमधील चाळ बिल्डर समय चौहान हत्याप्रकरणी कुख्यात गॅंगस्टर सुभाषसिंग ठाकूरला उत्तर प्रदेशातील फतेहगढ मध्यवर्ती कारागृहातून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. मिरा-भाईंदर वसई-विरार पोलिस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा कक्ष चारच्या पथकाने ही कारवाही केली. मंगळवारी (ता. १६) दुपारी ठाकूर (वय ७४) याला ठाणे विशेष सत्र न्यायालय मकोका कोर्टात हजर केले असता २२ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. १९९२ला जेजे हॉस्पिटलमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणात आजीवन कारावास शिक्षेत सुभाषसिंग ठाकूर हा ३३ वर्षांपासून शिक्षा भोगत आहे.
विरारमधील चाळ बिल्डर समय चौहान याची २६ फेब्रुवारी २०२२ला विरार पूर्व डी मार्टजवळ दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. याबाबत विरार पोलिस ठाण्यात वेगवेगळ्या गंभीर कलमांखाली गुन्हा नोंद करून, १३ आरोपींना अटक करण्यात आली. तर याचा मुख्य सूत्रधार सुभाषसिंग ठाकूर हा अटक करणे बाकी होते. गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे, सहाय्यक पोलिस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रमोद बडाख यांच्या पथकाने सर्व गुन्ह्यांच्या तापासाअंती चार वर्षांनंतर सुभाषसिंग ठाकूर याला सोमवारी (ता. १५) उत्तर प्रदेशातील फतेहगड मध्यवर्ती कारागृहातून ताब्यात घेऊन रात्री मिरा रोडमध्ये घेऊन आले. मंगळवारी दुपारी ठाणे येथील विशेष सत्र न्यायालय, मकोका कोर्टात हजर केले असता न्यायालयाने २२ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
समय चौहान हत्याकांड प्रकरण काय आहे?
समरजित ऊर्फ समय विक्रमसिंग चौहान असे हत्या झालेल्या चाळ बिल्डरचे नाव आहे. २०१८ पासून विरार फुलपाडा येथील मिळकतीच्या विकासावरून मृत समय चौहान याचे आरोपी राहुल दुबे आणि इतरांशी वादविवाद चालू होते. तसेच याचे विरार परिसरातील वाढते प्राबल्य व वृद्धिंगत होणाऱ्या व्यवसायामुळे त्याचे विरोधक निर्माण झाले होते. वाढते प्राबल्य संपुष्टात आणण्यासाठी आरोपी बांधकाम व्यवसायिक राहुल दुबे, त्याचे साथीदार राजकुमार यादव, श्याम यादव, अनुराग पांडे यांनी एकत्र येऊन समय चौहान याचा काटा काढण्यासाठी उत्तर प्रदेशातील फतेहगड येथील मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला शिक्षाबंदी व बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये उपचारासाठी दाखल असलेला कुख्यात गॅंगस्टार सुभाषसिंग ठाकूर याची एप्रिल २०२१ मध्ये भेट घेऊन, समय चौहान यास मारण्याची सुपारी दिली होती. त्यानंतर सुभाषसिंग ठाकूर याने त्याचे साथीदार अखिलेश तिवारी याच्यामार्फत राहुल शर्मा ऊर्फ राम याच्या नेतृत्वाखाली मनीष सिंग ऊर्फ सोनू, अर्जुन सिंग ऊर्फ अज्जू, अभिषेक सिंग यांच्यावर समय चौहान यांच्या हत्येची जबाबदारी दिली होती. यासाठी लागणारे अग्निशस्त्र, प्रवास तिकीट, विरार येथे पोहोचल्यानंतर त्याच्या राहण्याची सोय, गुन्हा करण्यासाठी आवश्यक वाहन, यासह अन्य याची सर्व व्यवस्था अखिलेश तिवारी याने वरील आरोपींच्या मदतीने केली होती. त्यानंतर सर्व कट रचून २६ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी १ वाजून २५ मिनिटाला समय चौहान याची विरारमध्ये गोळ्या घालून हत्या करून आरोपी फरार झाले होते.
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंग ठाकूर कोण आहे?
सुभाषसिंग ठाकूर हा कुख्यात गँगस्टर आहे. जेलमध्ये राहून तो महाराष्ट्रसह उत्तर प्रदेश, बिहारसह अन्य राज्यांत आपली टोळी चालवत होता. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १९९२ मध्ये जेजे रुग्णालयात जो गोळीबार झाला होता, त्या टोळीचे नेतृत्व हा सुभाषसिंह ठाकूर करत होता. अरुण गवळी टोळीचा शूटर शैलेश हलदणकर याचा खून करण्यासाठी जेजे रुग्णालयातील वॉर्डवर हल्ला करण्यात आला होता. दाऊद इब्राहिमचा मेहुणा इब्राहिम पारकर यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी हा हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. या हल्ल्यात हलदणकर यांच्यासह दोन पोलिस कॉन्स्टेबल्सचा गोळीबारात मृत्यू झाला होता. याच गुन्ह्यात सुभाषसिंग ठाकूर हा आजीवन कारावासाची शिक्षा भोगत असताना आपल्या टोळीमार्फत गुन्हेगारी कारवाया सुरू होत्या. त्यातील एक विरार समय चौहान हत्याकांड असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.

