शहरी नक्षलवाद प्रकरण :

शहरी नक्षलवाद प्रकरण :

Published on

गौतम नवलखांना दिल्लीत राहू देण्यास हरकत काय?
न्यायालयाची ‘एनआयए’ला विचारणा

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १६ : शहरी नक्षलवादाप्रकरणी जामिनावर असलेले सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा यांना प्रत्यक्ष खटला सुरू होईपर्यंत दिल्लीतील घरात राहू देण्यास हरकत काय आहे, अशी विचारणा उच्च न्यायालयाने मंगळवारी (ता. १६) राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) केली. त्याच वेळी नवलखा यांना तशी परवानगी देण्यास सकारात्मक असल्याचेही न्यायालयाने प्रामुख्याने नमूद केले. 

नवलखा पळून जातील असा धोका नाही. तसा प्रयत्नही त्यांनी केलेला नाही. त्यामुळे जामिनावर बाहेर असतानाही या प्रकरणाच्या कारणास्तव त्यांना मुंबईत रहावे लागत आहे. ते त्यांच्या आयुष्यापासून व सामाजिक वर्तुळापासून पूर्णपणे दुरावल्याचे निरीक्षणही न्या. भारती डांगरे आणि न्या. श्याम चांडक यांच्या खंडपीठाने नवलखा यांना दिलासा देण्याबाबत सकारात्मक असल्याचे नमूद करताना नोंदवले. नवलखा हे ७३ वर्षांचे असून, सध्या मुंबईत भाड्याने राहत आहेत ते मूळचे दिल्लीचे आहेत आणि त्यांचे तिथे घर आहे. त्यांच्यावरील खटल्याला अद्याप सुरुवात झालेली नाही. ही स्थिती अशीच सुरू राहिल्यास नवलखा हे दिवाळखोर होतील, असे त्यांची बाजू मांडताना वकील युग चौधरी यांनी न्यायालयाला सांगितले. त्याच वेळी नवलखा दिल्लीतील राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए)च्या कार्यालयातून ‘व्हिसी’मार्फत खटल्याच्या सुनावणीला उपस्थित राहतील, सत्र न्यायालय आदेश देईल किंवा सरकारी वकील सांगतील, तेव्हाही ते स्वतः सत्र न्यायालयात हजर होतील, असेही चौधरी यांनी न्यायालयाला सांगितले.  त्यावर, आम्ही नवलखा यांना दिल्लीतून खटल्याला उपस्थित राहण्याची परवानगी देणार नाही, परंतु खटला सुरू होईपर्यंत त्यांना दिल्लीत राहण्याची परवानगी देण्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत. नवलखांवर तपास यंत्रणा अतिरिक्त अटी घालू शकते, असे नमूद करून न्यायालयाने सुनावणी बुधवारी ठेवली.

..
सत्र न्यायालयाने अर्ज फेटाळला
नवलखा यांना २०२३ मध्ये उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता, परंतु  त्यांनी सत्र न्यायालयाच्या पूर्व परवानगीशिवाय मुंबई सोडून जाऊ नये, अशी अट त्यांना घातली होती. यावर्षी नवलखा यांनी सत्र न्यायालयात अर्ज करून त्यांना दिल्लीत राहू देण्याची परवानगी मागितली होती. तथापि, सत्र न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळल्याने नवलखा यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.

Marathi News Esakal
www.esakal.com