विजयाचा गुलाल आपणच उडवणार
विजयाचा गुलाल आपणच उडवणार
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १६ : ‘लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत विरोधकांचा टांगा पलटी केला. आता महापालिका निवडणुकीत पाणी पाजून टांगा फरार करू,’ असा टोला लगावत १६ जानेवारीला विजयाचा गुलाल आपणच उधळणार, असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकत्यांना दिला. ठाणे महापालिका निवडणुकीची सुपारी फुटली आहे, त्यामुळे कामाला लागा, असे आवाहनही त्यांनी केले. दरम्यान, महायुतीच्या जागावाटपात तिकीट मिळाले नाही तर खचून जाऊ नका, शिवसेना वाढतेय, पदे निर्माण होतील, असा विश्वास देत नाराजांची समजूत काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील टिप-टॉप प्लाझा येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्याला मार्गदर्शन केले. या वेळी आगामी महापालिका निवडणुकीत महायुतीचा भगवा फडकवण्याचा निर्धारदेखील व्यक्त केला. मुख्यमंत्री असताना आणि त्यानंतरही ठाणे व महाराष्ट्राच्या विकासासाठी केलेल्या कामांचा आढावा घेताना शिंदे यांनी समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड, अटल सेतू, मेट्रो प्रकल्प, सिटी पार्क, मोठे पायाभूत प्रकल्प यांचा उल्लेख केला. ठाण्यातील वाहतूक कोंडी लवकरच इतिहासजमा होईल, असा विश्वास व्यक्त करत ‘एकनाथ शिंदे जो बोलतो तो करून दाखवतो’ हे सांगितले.
कार्यकर्ते हा पक्षाचा पाया
नागपूर दौऱ्यादरम्यान प्रकृती बरी नव्हती; मात्र कार्यकर्त्यांना भेटून उत्साह वाढल्याचे सांगत, कार्यकर्ते हेच माझे टॉनिक आहेत. तेच माझी ऊर्जा आणि प्रेरणा आहेत, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. हजारोंच्या संख्येने शिवसैनिक भेटल्यावर आपली तब्येतही सुधारते, असे त्यांनी भावनिक शब्दांत सांगितले. नेते, पदे येतात-जातात; पण कार्यकर्ता हा पक्षाचा खरा पाया आहे, असे ते म्हणाले.
चौकट
उद्धव ठाकरे गटाला धक्का
नवी मुंबईतील शिवसेना ठाकरे गटाच्या तीन तर काँग्रेसच्या एक अशा चार माजी नगरसेवकांचे या मेळाव्यात शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश झाला. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक मनोहर मढवी (एम.के.), विनया मढवी, करण मढवी तर काँग्रेसचे नगरसेवक अमित पाटील, मिथुन पाटील, पूनम मिथुन पाटील या चार जणांनी प्रवेश केला. नवी मुंबईत ठाकरे गटाला हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

