सहा. शिक्षिका पूर्वा सकपाळ यांची मुंबईतून नवोपक्रम उपक्रमासाठी निवड
शिक्षिका पूर्वा सकपाळ यांची नवोपक्रम उपक्रमासाठी निवड
शरद पवार इन्स्पायर फेलोशिप २०२५ अंतर्गत गौरव
घाटकोपर, ता. १७ (बातमीदार) ः शिक्षण क्षेत्रातील नवोपक्रमांना प्रोत्साहन देणाऱ्या शरद पवार इन्स्पायर फेलोशिप २०२५ (शिक्षण विभाग)अंतर्गत राज्यभरातून प्राप्त झालेल्या तब्बल ४७५ नवोपक्रम प्रस्तावांपैकी केवळ ३० नवोपक्रमांची अंतिम निवड करण्यात आली. या मानाच्या यादीत घाटकोपर पूर्व, कामराजनगर येथील भैरव विद्यालयाच्या प्राथमिक विभागात कार्यरत असलेल्या सहाय्यक शिक्षिका पूर्वा प्रमोद सकपाळ यांची निवड करण्यात आली आहे.
पूर्वा सकपाळ यांनी सादर केलेला नवोपक्रम शिक्षण प्रक्रियेला अधिक परिणामकारक, विद्यार्थीकेंद्रित व आधुनिक पद्धतीने समृद्ध करणारा असल्याने तो निवड समितीच्या विशेष पसंतीस उतरला. त्यांच्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देत नव्या विचारांची आणि नावीन्यपूर्ण अध्यापन पद्धतींची प्रभावी मांडणी करण्यात आली आहे. या फेलोशिपचा प्रदान सोहळा रविवारी (ता. १४) नरिमन पॉइंट येथे उत्साहात पार पडला. या वेळी ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते पूर्वा सकपाळ यांना फेलोशिप प्रदान करण्यात आली. या यशाबद्दल शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातून पूर्वा सकपाळ यांचे अभिनंदन होत आहे.

