६ लाखांची लाच दोघांना भोवली
सहा लाखांची लाच दोघांना भोवली
भूमी अभिलेख कार्यालयाचे अधिकारी अटकेत
नवी मुंबई, ता. १७ (वार्ताहर) ः आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रभाव क्षेत्रात (नैना) भूखंड मोजणीच्या पत्रासाठी सहा लाखांची लाच मागितली होती. या प्रकरणात नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भूमी अभिलेख कार्यालयातील दोघा लोकसेवकांना बेलापूर स्थानक परिसरातून अटक केली आहे.
कामोठे येथील रहिवासी असून एका विकसकाकडे कामाला आहे. या विकसकाने नैना क्षेत्रातील टीपीएस-१ मधील भूखंड क्रमांक २७ खरेदी केला असून त्याच्या मोजणीसाठी भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज केला होता. ५ डिसेंबर भूखंडाची मोजणी केल्यानंतर मोजणीचे ‘क’ पत्र देण्यासाठी लोकसेवकांनी तक्रारदाराकडे दोन लाखांची लाच मागितली होती. या प्रकरणात १५ डिसेंबरला लाचलुचपत विभागाच्या नवी मुंबई पथकाकडे लेखी तक्रार दाखल केली. पथकाने सापळा रचत बेलापूर रेल्वे स्थानक पार्किंगमधून नीमताणदार कलीमउद्दीन शेखला, तर उपअधीक्षक दिलीप बागुलेला ताब्यात घेतले. या प्रकरणात सीबीडी-बेलापूर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अंतर्गत कलम ७ व १२ अन्वये गुन्हा दाखल आहे.

