दंगा काबू पथकाची तालीम
दंगा काबू पथकाची तालीम
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वाशीत प्रात्यक्षिके
नवी मुंबई, ता. १७ (वार्ताहर) : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी वाशी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दंगा काबू योजनेची रंगीत तालीम घेण्यात आली. वाशी येथील सेक्टर एकमधील सेक्रेड हायस्कूलच्या मैदानात प्रात्यक्षिके घेण्यात आली.
निवडणूक काळात उद्भवणाऱ्या संभाव्य अनुचित घटनांना सामोरे जाण्यासाठीच्या सरावात दंगा काबू योजनेसाठी दोन पोलिस अधिकारी, २५ पोलिस अंमलदार सहभागी झाले होते. याशिवाय अग्निशमन दलाचे पथक, टेंडर व्हॅन तसेच रुग्णवाहिका तैनात होती. रंगीत तालमीदरम्यान जमाव नियंत्रण, परिस्थिती हाताळण्याची कार्यपद्धती, आपत्कालीनप्रसंगी समन्वय साधणे, तसेच नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले. या सरावातून निवडणूक काळात कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज असल्याचा संदेश देण्यात आला आहे. तसेच निवडणुका शांततेत आणि निर्भय वातावरणात होतील, असा संदेश देण्यात आला.

