नालासोपारामध्ये आरोग्य गप्पाचा कार्यक्रम
नालासोपारामध्ये ‘आरोग्य गप्पा’चा कार्यक्रम
विरार, ता. १७ (बातमीदार) : नालासोपारा येथील रिद्धीविनायक रुग्णालयात रविवारी (ता. २१) सायंकाळी ४ ते ७ या वेळेत ‘असे छान निरोगी जगू या’ या विषयावर आरोग्यविषयक विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध वैद्यकीय संघटना आणि वसई तालुका पत्रकार संघाच्या सहकार्याने हा उपक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमात ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सुरेश पाटील आणि बालरोगतज्ज्ञ डॉ. सतीश अग्रवाल यांना त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील बहुमोल योगदानाबद्दल ‘आरोग्य ज्ञानेश्वर’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
या आरोग्य गप्पांमध्ये डॉ. सुरेश पाटील, डॉ. सतीश अग्रवाल यांच्यासह मुंबईचे डॉ. राजेंद्र आगरकर आणि विरारचे डॉ. हेमंत जोशी हे तज्ज्ञ डॉक्टर सहभागी होऊन नागरिकांना आरोग्यदायी जीवनशैलीबाबत मार्गदर्शन करणार आहेत. नालासोपारा व विरारमधील विविध मेडिकल असोसिएशन आणि महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

