सोसायटी व्हाट्सअप ग्रुपमधील वाद थेट रस्त्यावर
सोसायटी व्हॉट्सॲप ग्रुपमधील वाद विकोपाला
उल्हासनगरमध्ये बाप-लेकावर भररस्त्यात हल्ला
उल्हासनगर, ता. १७ (वार्ताहर) : सोसायटीच्या व्हॉट्सॲप ग्रुपमधील शाब्दिक चकमकीचा शेवट भीषण हाणामारीत झाल्याची घटना उल्हासनगर-५ मध्ये घडली आहे. आक्षेपार्ह टिप्पणीवरून झालेल्या वादातून एका कुटुंबाने शेजाऱ्याच्या बाप-लेकावर दगड आणि लाथाबुक्क्यांनी हल्ला केला. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, हिललाइन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगर-५ येथील रहिवासी गुलाब मोटवानी आणि गुरमुख वलेचा यांच्यात काही दिवसांपूर्वी सोसायटीच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर चर्चा सुरू होती. या चर्चेदरम्यान वलेचा यांनी मोटवानी परिवाराविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. याच कारणावरून दोन्ही कुटुंबांत तणाव निर्माण झाला होता.
रविवारी (ता. १४) रात्री उशिरा गुरमुख वलेचा हे आपल्या पत्नी आणि मुलांसह गुलाब मोटवानी यांच्या घरासमोर आले. तिथे दोन्ही बाजूंमध्ये पुन्हा शाब्दिक युद्ध सुरू झाले. या वेळी मोटवानी यांचा मुलगा वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी करायला गेला असता, गुरमुख वलेचा आणि त्यांच्या दोन मुलांनी त्याच्यावर थेट हल्ला चढवला, तर भांडण सोडवण्यासाठी गेलेले गुलाब मोटवानी यांच्या डोक्यावर दगडाने प्रहार करण्यात आला. या हल्ल्यात मोटवानी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्या मुलाच्या कानाजवळही जखम झाली आहे.
पोलिस कारवाई
घटनेनंतर गुलाब मोटवानी यांनी दिलेल्या तक्रारीवरून हिललाइन पोलिसांनी गुरमुख वलेचा आणि त्यांच्या दोन मुलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेऊन पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

