केडीएमसी निवडणुकीसाठी भाजपा शिवसेना शिंदे पक्ष युतीचे संकेत मात्र जागा वाटपाचा तिठा गुलदस्त्यात....
जागा वाटपाचा तिढा वाढणार?
पालिका निवडणुकीत शिंदे गट-भाजपची युती, मात्र महापौरपदासाठी नगरसेवकांची पळवापळवी
कल्याण, ता. १७ (वार्ताहर) ः कल्याण-डोंबिवली पालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिंदे गट या दोन्ही पक्षांच्या वरिष्ठांनी युतीने निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहेत. मात्र, पालिकेवर आपलाच महापौर बसविण्यासाठी भाजपा-शिंदे गटांमध्ये पक्षप्रवेशावरुन जोरदार रस्सीखेच सुरु आहे. अन्य पक्षातील माजी नगरसेवकांना प्रवेश देऊन त्यांच्या जागा आपल्या पारड्यात पाडून घेण्यासाठी दोन्ही पक्षांनी ताकद लावली आहे. यामुळे निवडणुकीत युतीचे संकेत असले तरी जागा वाटपाचा तिढा सुटणार का, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.
कल्याण-डोंबिवली पालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. यंदाच्या निवडणुका प्रथमच चार सदस्यीय पॅनल पद्धतीने होणार असल्याने भाजपा-शिंदे गटाने आपल्या पक्षाला पोषक असेच प्रभाग पाडल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला होता. तर विरोधी पक्षातील माजी नगरसेवकांनी पराभूत होण्याच्या भीतीने भाजपा-शिंदे गटात प्रवेशाला सुरुवात केली आहे. तत्कालीन शिवसेना पक्षात फूट पडल्याने ठाकरे पक्ष तर दुसरीकडे शिंदे गट अशी थेट लढत रंगणार आहे. ज्या पक्षाच्या जागा अधिक त्याच पक्षाचा महापौर असल्याने दोन्ही पक्षात पक्षप्रवेशाचे राजकारण रंगले आहे. माजी नगरसेवकांना आपल्या पक्षात प्रवेश घेण्यासाठी दोन उमेदवारी तिकिटे आणि विविध प्रकारची आमिष दाखवली जात आहे.
पालिकेत शिंदे गट व भाजपाने आपले पक्षीय संख्याबळ वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश करुन घेतले आहेत. यामुळे पालिका निवडणूक भाजपा आणि शिंदे गटाने युतीने लढवण्याचे संकेत दिले जात असले तरी दोन्ही पक्षांमध्ये अन्य पक्षातील माजी नगरसेवकांचा वाढता ओघ लक्षात घेता जागा वाटप कसे होणार हा उत्सुकतेचा विषय बनला आहे. मागील निवडणुकीत तत्कालीन शिवसेना पक्षाचे ५३ तर भाजपाचे ४३ लोकप्रतिनिधी निवडून आले होते. त्या खालोखाल विरोधी पक्षातील मनसे नऊ, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा व अन्य पक्ष, अपक्ष असे ११ लोकप्रतिनिधी निवडून आले होते.
पक्षीय संख्याबळाचे नवे समीकरण
शिंदे गट : मूळ ५० माजी नगरसेवकांसह, मनसे (३), काँग्रेस (१), अपक्ष व अन्य (७) अशा एकूण ६१ माजी नगरसेवकांचे पाठबळ मिळवण्यात शिंदे गट यशस्वी झाला आहे.
भाजप : मूळ ४३ संख्याबळ असलेल्या भाजपनेही अन्य पक्षांतील ६ माजी नगरसेवकांना प्रवेश देऊन आपली संख्या ४९ वर नेली आहे.
१२ माजी नगरसेवकांच्या निर्णयाकडे लक्ष
अद्यापही ठाकरे गट, मनसे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून १२ माजी नगरसेवक कोणत्याही गटात सामील झालेले नाहीत. या उरलेल्या नगरसेवकांना आपल्याकडे खेचण्यासाठी भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षांनी पूर्ण ताकद लावली आहे.

