कल्याण डोंबिवलीत राजकीय उलथापालथ

कल्याण डोंबिवलीत राजकीय उलथापालथ

Published on

डोंबिवलीत मनसेला भगदाड
अनुभवी शिलेदार बाहेर, राज ठाकरेंची संघटनात्मक खेळी
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १७ ः कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होताच शहरातील राजकारण वेगाने कलाटणी घेत आहे. एकीकडे भाजप व शिवसेना शिंदे गटाकडून विरोधी पक्षांतील नेत्यांना आपल्या गोटात ओढण्याचे प्रयत्न सुरु असतानाच, दुसरीकडे मनसेतून महत्त्वाच्या नेत्यांचे राजीनामे आणि त्याच वेळी नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांमुळे राजकीय वातावरण तापले आहे.
कल्याण-डोंबिवली पालिकेत मनसेची सुरुवातीपासूनच स्वतंत्र ओळख राहिली आहे. पहिल्याच पालिका निवडणुकीत मनसेचे २७ नगरसेवक निवडून आले होते. तर त्यानंतरच्या निवडणुकीत नऊ नगरसेवक निवडून आले. संख्या कमी असली तरी मनसेने विरोधी पक्ष म्हणून आक्रमक भूमिका घेत आपले अस्तित्व ठळकपणे दाखवून दिले. कल्याण ग्रामीणचे माजी आमदार राजू पाटील यांनीही या नगरसेवकांना सातत्याने पाठिंबा देत मनसेची ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला.
मात्र यंदाच्या निवडणुकीच्या तोंडावर मनसेला मोठे धक्के बसताना दिसत आहेत. मनसेचे जिल्हाध्यक्ष तथा माजी विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर, त्यांच्या पत्नी सरोज भोईर तसेच सुदेश चुडनाईक यांना भाजपाने आपल्या गोटात घेतल्याने डोंबिवली पश्चिमेतील मनसेची ताकद लक्षणीयरीत्या कमी झाली. त्याच काळात मंदा पाटील, कस्तुरी देसाई, कोमल पाटील आणि मनोज घरत हेही पक्ष सोडणार असल्याची जोरदार चर्चा रंगल्या होत्या. त्यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतः पुढाकार घेत या माजी लोकप्रतिनिधींशी चर्चा करून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला.
तरीही प्रकाश भोईर यांचा पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता मनसेचे माजी शहराध्यक्ष कौस्तुभ देसाई आणि त्यांची पत्नी, माजी नगरसेविका कस्तुरी देसाई यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने मनसेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
विशेष म्हणजे कौस्तुभ देसाई यांचे भाऊ कल्पेश देसाई यांनी काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे कौस्तुभ आणि कस्तुरी देसाई हे पुढे नेमक्या कोणत्या पक्षात प्रवेश करणार, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

भाकरी फिरवली
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संघटनात्मक पातळीवर ‘भाकरी फिरवण्याची’ रणनीती अवलंबली आहे. युवा नेतृत्वांच्या खांद्यावर जबाबदारी देत आगामी पालिका निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. राज ठाकरे यांच्या आदेशानुसार बुधवारी (ता. १७) नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com