पोलिस भरतीचा सराव भीतीच्या छायेत?
सुधाकर वाघ : सकाळ वृत्तसेवा
टोकावडे, ता. १७ : मुरबाड तालुक्यात बिबट्याचा वावर वाढल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहे. याचा परिणाम तरुणांच्या पोलिस भरतीच्या सरावावर होताना दिसून येत आहे. पोलिस भरतीसाठी शारीरिक चाचणीची तयारी करणारे तरुण-तरुणी पहाटेच्या वेळेत धावण्याचा सराव करत असले, तरी मनात सतत भीतीचे सावट असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात दिसून येत आहे.
तालुक्यातील जंगलालगतचे रस्ते, शेतशिवार; तसेच काही वाड्या-वस्त्यांच्या परिसरात रात्री बिबट्याचा वावर वाढल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहेत. त्यामुळे पहाटे सरावासाठी घराबाहेर पडणाऱ्या उमेदवारांना अधिक सतर्क राहावे लागत आहे. काही ठिकाणी तरुण गटागटाने धावण्याचा सराव करताना दिसत आहे. एकटे सराव करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. ग्रामीण भागात पोलिस भरतीसाठी आवश्यक असलेल्या प्रशिक्षण अकादमी आणि मार्गदर्शन केंद्रांची संख्या मर्यादित आहे. त्यामुळे बहुतांश तरुण रस्त्यांवर, माळरानात धावण्याचा व शारीरिक तंदुरुस्तीचा सराव करत आहेत. मात्र, सकाळच्या वेळी वाढलेली थंडी आणि त्यातच बिबट्याच्या वावराच्या चर्चांमुळे उशीराने सराव करत असल्याचे उमेदवारांकडून सांगण्यात येत आहे. भीती, थंडी आणि असुरक्षिततेच्या वातावरणातही मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर पुढे जाण्याचा त्यांचा निर्धार मुरबाड तालुक्यातील ग्रामीण भागात प्रकर्षाने दिसून येत
वेळेत बदल
मुरबाड, शहापूर तालुक्यात बिबट्याचा वावर असल्याच्या घटना समोर येत असल्याने तरुणांमध्ये भीती निर्माण झाली आहे. काही पालकांनी आपल्या मुलांनी पहाटे एकटे सरावासाठी जाऊ नये, अशी खबरदारी घेतल्याचेही समजते. त्यामुळे अनेक तरुणांनी सरावाची वेळ बदलली असून, काहींनी सकाळी नऊ नंतरच्या वेळेत सराव करण्याचा पर्याय स्वीकारला आहे.
ज्या परिसरात बिबट्याचा वावर दिसून येतो, तेथे पहाटेच्या वेळी धावणाऱ्या तरुणांनी समूहाने राहावे. एकटे जाणे टाळावे. शक्यतो मोबाईलचा वापर करून गाणे लावावे, ज्यामुळे वन्यप्राणी मानवांपासून दूर राहतात.
- एम. जी. डफरे, वनपरिक्षेत्रपाल, टोकावडे उत्तर
आमच्या परिसरातील तरुण पोलिस भरतीचा सराव करतात; परंतु बिबट्याचा वावर वाढल्यामुळे पहाटे धावताना त्यांच्या मनामध्ये भीती वाटत आहे.
- मुकुंद कराळे, ग्रामपंचायत सदस्य, खोपिवली
टोकावडे : बिबट्याच्या वावराच्या चर्चांमुळे ग्रामीण भागातील तरुण गटागटाने सराव करत आहेत.

