प्रभाग १२४ मध्ये दोन्ही शिवसेना आमने-सामने
प्रभाग १२४ मध्ये दोन्ही शिवसेना आमनेसामने
मुस्लिम मते निर्णायक ठरणार
नीलेश मोरे ः सकाळ वृत्तसेवा
घाटकोपर, ता. १७ ः प्रभाग क्रमांक १२४ हा एन आणि एस विभागाची सामाईक सीमा असलेला मतदारसंघ आहे. या प्रभागामध्ये यंदा दोन्ही शिवसेना आमनेसामने असणार आहेत. मुस्लिम मते निर्णायक ठरतील, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
डोंगराळ आणि झोपड्यांनी आच्छादलेल्या या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार) प्राबल्य राहिले आहे. हारून खान हे दोन वेळा तर त्यांची पत्नी ज्योती हारून खान या एक वेळा या प्रभागातून नगरसेवक म्हणून निवडून येत आहेत.
सध्या हारून खान व त्यांच्या पत्नी ज्योती खान या शिवसेना शिंदे पक्षात असून यंदाही हा प्रभाग महिलांसाठी राखीव असल्याने पुन्हा त्या निवडणुकीसाठी सज्ज झाल्या आहेत. तर शिवसेना ठाकरे गटातून युवा समन्वयक इरफान शेख यांच्या मातोश्रींना रिंगणातून उतरवले जात आहे; परंतु १५ वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) यांचा हा प्रभाग बालेकिल्ला असल्याने महाविकास आघाडीत शरद पवार गट तिकिटासाठी दावा नक्कीच करू शकेल.
नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार) प्रवक्तेपदी नियुक्त असलेले नितीन देशमुख हेसुद्धा त्यांच्या पत्नी या प्रभागातून तिकीट मिळवण्यासाठी इच्छुक आहेत. प्रभाग १२४ मध्ये टाटा पॉवर लिंक रोड ते प्रेसिडेंटल टाॅवर, आरसीटी मॉलसमोरील परिसर ते अमृतनगर कॉर्नरपर्यंतचा परिसर येतो. या प्रभागात पाण्याची मोठी समस्या आहे. प्रबोधनकार ठाकरे उद्यानाची अवस्था गंभीर आहे. शौचालयाचे सांडपाणी उद्यानामध्ये सोडले जात असल्याने नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.
प्रभाग १२४ची एकूण लोकसंख्या ही ५७ हजार २४९ इतकी असून मराठी, मुस्लिम, उत्तर भारतीय मतदार लक्षणीय आहेत. १८ ते २० हजार एवढी मुस्लिम मतदारांची संख्या आहे.
लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे संजय दिना पाटील हे निवडून आले आहेत. तर विधानसभेत भाजपचे आमदार राम कदम हे ३,६६३ मतांनी पिछाडीवर आहेत. तर उबाठातून विधानसभा निवडणूक लढलेले संजय भालेराव यांना या प्रभागातून १०,६०८ मते मिळाली आहेत. यंदा हा प्रभाग सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित आहे.
गेली १५ वर्षे हारून खान हे राष्ट्रवादी काँग्रेसमधून या प्रभागातून निवडून येत आहेत; मात्र त्यांचा शिंदेेंच्या शिवसेनेत प्रवेश झाल्याने येथील संपूर्ण राजकीय चित्र बदलले आहे. या प्रभागातून मुस्लिम मते निर्णायक ठरतील, असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.
विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे उमेदवार संजय भालेराव यांनी साडेतीन हजारांची आघाडी घेतली असल्याने राष्ट्रवादी (शरद पवार) आणि ठाकरे बंधूंच्या युतीत महाविकास आघाडीला सहज विजय मिळू शकेल, अशी चर्चा सुरू आहे.
लोकसभा आणि विधानसभेत मुस्लिम मते आपल्या पारड्यात पाडण्यात शिवसेनेला यश आल्याने प्रभाग १२४ मधून शिंदेेंच्या शिवसेनेला शह देण्यासाठी शिवसेना ठाकरे गट या प्रभागातून उमेदवार देण्यासाठी प्रयत्न करेल, असे दिसते.
या प्रभागातील सामाजिक कार्यकर्ते मनोहर जरियाल म्हणाले, पाण्याची मोठी समस्या आहे. फायर ब्रिगेड रोड नंबर एकपासून ते आनंदगडपर्यंत नेहमीची होणारी वाहतूक कोंडी, सततचे वाजणारे हॉर्न यामुळे रहिवासी त्रस्त असल्याचे त्यांनी सांगितले.
मतदार खलील खोत म्हणाले, पार्कसाईट विभागात विकासाची काहीच कामे झालेली नाहीत. लहान मुलांना खेळण्यासाठी मैदान, अभ्यास केंद्र यावर भर दिला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
२०१७चा पालिका निकाल
ज्योती हारून खान, राष्ट्रवादी- ६,६८६ मते
नमिता जीवन किणी, भाजप- ३,९०६ मते
शामली शैलेश तळेकर, शिवसेना- ३,५६९ मते
प्रभागातील समस्या
- पाण्याची समस्या
- नागरिकांसाठी एकमेव असलेल्या प्रबोधनकार ठाकरे उद्यानामध्ये शौचालयाचे पाणी सोडण्यात येते. त्यामुळे दुर्गंधीचा रहिवाशांना सामना करावा लागतो. शौचालयाची अवस्था बिकट झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

