चार वर्षांचे प्रशासक राज संपणार!
चार वर्षांचे प्रशासक राज संपणार!
पनवेल महापालिकेत महिनाभरात लोकप्रतिनिधींचा प्रवेश
पनवेल, ता. १७ (बातमीदार) : पनवेल महापालिकेवर गेल्या तब्बल चार वर्षांपासून सुरू असलेल्या प्रशासक राजचा शेवट आता जवळ आला आहे. २०१७ मध्ये स्थापन झालेल्या पनवेल महापालिकेचा कार्यकाळ ९ जुलै २०२२ रोजी संपल्यानंतर लोकप्रतिनिधीविना सुरू असलेला कारभार येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या मतदानानंतर समाप्त होणार आहे. १६ जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाल्यानंतर निवडून आलेले नगरसेवक पुन्हा एकदा महापालिकेची सूत्रे हाती घेणार आहेत. त्यामुळे प्रशासक काळातील कारभाराबाबत राजकीय पक्ष, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
पनवेल महापालिकेची पहिली सार्वत्रिक निवडणूक २०१७ रोजी पार पडली होती. त्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ५१ नगरसेवक निवडून आणत महापालिकेवर सत्ता स्थापन केली होती, मात्र कार्यकाळ संपल्यानंतर राज्यभरातील महापालिका निवडणुका रखडल्याने पनवेल महापालिकेवर प्रशासक नियुक्त करण्यात आला. सुरुवातीला गणेश देशमुख, तर नंतर मंगेश चितळे यांनी प्रशासक म्हणून कारभार पाहिला. या कालावधीत महापालिकेत एकही लोकप्रतिनिधी नसल्याने प्रशासनावर लोकशाही नियंत्रण राहिले नाही, अशी नागरिकांची भावना आहे. स्थायी समिती आणि महासभा अस्तित्वात नसल्यामुळे जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी कोणतेही व्यासपीठ उपलब्ध नव्हते. परिणामी, प्रशासक व अधिकाऱ्यांच्या एकहाती निर्णयातूनच ठराव मंजूर झाले, निविदा काढल्या गेल्या आणि मोठ्या आर्थिक व्यवहारांना मान्यता देण्यात आली. नगरसेवक नसल्याचा फायदा घेत ठेकेदारांचा वावर वाढल्याचा आरोपही होत आहे. मूलभूत सुविधा, आरोग्यसेवा, प्राथमिक आरोग्य केंद्रे, महापालिका रुग्णालय आणि मालमत्ता करासारख्या ज्वलंत प्रश्नांकडे अपेक्षित गांभीर्याने लक्ष दिले गेले नाही, अशी सार्वत्रिक टीका आहे. उलट महापालिका इमारती, प्रभाग कार्यालये आणि इतर बांधकामांवर मोठ्या प्रमाणात खर्च झाल्याचे चित्र दिसते.
....................
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे समन्वयक प्रदीप ठाकूर यांनी लोकप्रतिनिधी नसल्याने स्थानिक स्वराज्य संस्थेची लोकशाही भूमिका चार वर्षे लोप पावल्याची प्रतिक्रिया दिली. दरम्यान, निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सत्तास्थापना होऊन नगरसेवक महापालिकेत कार्यरत होतील आणि जनतेचे प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडले जातील, असा विश्वास शिवसेनेचे खांदा कॉलनी शहरप्रमुख शिवाजी थोरवे यांनी व्यक्त केला आहे, तर प्रशासक राजमध्ये मनमानी कारभार झाला. या निवडणुकीत पनवेलकर सुज्ञ लोकप्रतिनिधी निवडून देतील, असा विश्वास कामोठे कॉलनी फोरमच्या महिला अध्यक्षा जयश्री झा सुद्रिक यांनी व्यक्त केला, तर जनसामान्यांचे हित जपणारे लोकप्रतिनिधी निवडून यावेत, अशी अपेक्षा रोडपाली येथील एकता सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत राऊत यांनी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

