महापालिकांच्या निवडणुकांसाठी रणनीती

महापालिकांच्या निवडणुकांसाठी रणनीती

Published on

महापालिकांच्या निवडणुकांसाठी रणनीती
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रात्री उशिरा खलबते; प्रत्येक महापालिकेसाठी ‘समन्वयक’ जाहीर
ठाणे, ता. १७ ः राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकाच टप्प्यात होणार असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. ठाण्यात पार पडलेल्या कार्यकर्ता मेळाव्यानंतर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री उशिरा प्रमुख नेत्यांची एक विशेष बैठक घेतली. या बैठकीत ठाणे जिल्ह्यातील सर्व महत्त्वाच्या महापालिकांच्या निवडणुकांसाठी रणनीती ठरवण्यात आली असून, दिग्गज नेत्यांवर विशिष्ट शहरांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

ठाणे जिल्हा व परिसरातील सर्व प्रमुख महापालिकांबाबत मंगळवारी (ता. १६) रात्री उशिरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रमुख नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत ठाण्यातील मेळाव्यानंतर झालेल्या या बैठकीला प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, रवींद्र फाटक, गोपाळ लांडगे, हेमंत पवार, विजय चौघुले यांच्यासह शिंदेसेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

निवडणुकीत महायुतीचे वर्चस्व राखण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी जबाबदाऱ्यांचे वाटप केले आहे. ठाणे महापालिकेची जबाबदारी खासदार नरेश म्हस्के यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिकांसाठी खासदार श्रीकांत शिंदे आणि गोपाळ लांडगे हे समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत. मिरा-भाईंदर महापालिकेची जबाबदारी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे देण्यात आली आहे. नवी मुंबई महापालिकेसाठीदेखील खासदार नरेश म्हस्के हे शिंदेसेनेच्या वतीने नेतृत्व करणार आहेत. तर वसई-विरार महापालिकेसाठी रवींद्र फाटक हे भाजपसोबत चर्चा व समन्वय साधणार आहेत.

वरिष्ठ नेत्यांचे ‘सुपरव्हिजन’
महायुतीमध्ये जागावाटपावरून किंवा स्थानिक पातळीवर काही पेच निर्माण झाल्यास, तो सोडवण्यासाठी त्रिसूत्री निश्चित करण्यात आली आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे या प्रक्रियेवर लक्ष ठेवून अंतिम तोडगा काढतील, असे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

Marathi News Esakal
www.esakal.com