१०१ वाहनांवर नियमभंगाची कारवाई
विनापरवाना वाहनांवर लक्ष
१०१ वाहनांवर नियमभंगाची कारवाई
ठाणे शहर, ता. १८ (बातमीदार) : रॅपिडो बाइक टॅक्सीला प्रवासी वाहतुकीची रीतसर परवानगी नसतानाही ठाण्यात अशा प्रकारची वाहतूक सर्रास सुरू आहे. या अनधिकृत आणि धोकादायक वाहतुकीवर अंकुश मिळवण्यासाठी ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. गेल्या आठ महिन्यांत १०१ वाहनांवर नियमभंगाची कारवाई करण्यात आली असून, यात रॅपिडोचालकांचा सर्वाधिक समावेश आहे. आरटीओने ठाणे, बोरिवली आणि वसई परिसरात केलेल्या कारवाईत प्रामुख्याने परवाना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांना लक्ष्य केले. एकट्या ठाण्यात विनापरवाना वाहतूक करणाऱ्यांकडून ६० हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
रिक्षा, टॅक्सीमधून केली जाणारी प्रवासी वाहतूक सार्वजनिक वाहतूक गटात येते. त्यामुळे प्रवाशांची वाहतूक करताना रिक्षा, टॅक्सी वाहनचालकांना वाहतूक नियमांचे पालन करावे लागते. हाच नियम ओला, उबर, रॅपिडोचालकांनादेखील आहे. त्यामुळे त्यांच्यावरही वाहतूक नियमांचा भंग केल्याची कारवाई केली जाते. ठाणे आरटीओने आठ महिन्यांत म्हणजे १ एप्रिल ते १८ नोव्हेंबर या कालावधीत एकूण १०१ रॅपिडो, ओला, उबरचालकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. या वाहनचालकांनी वाहतूक परवाना नियमांचा भंग केला होता. सर्वाधिक कारवाई ठाण्यात करण्यात आली आहे. ठाण्यात रॅपिडो बाइकला प्रवासी वाहतुकीला परवानगी देण्यात आली नसतानाही विनापरवाना प्रवाशांची वाहतूक केल्याने आरटीओने त्यांच्याकडून ६०,५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पाऊल
रॅपिडो बाइक टॅक्सीला अधिकृत परवानगी नसल्याने अशी वाहतूक प्रवाशांसाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे अनधिकृत वाहतुकीवर अंकुश मिळवण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. १ एप्रिलपासून सुरू झालेल्या या कारवाईत नियमांचा भंग करणाऱ्या चालकांना लक्ष्य करण्यात आले असून, आगामी काळातही ही मोहीम अधिक तीव्र करण्याचे संकेत आरटीओ प्रशासनाने दिले आहेत.
कारवाईची सांख्यिकी (१ एप्रिल ते १८ नोव्हेंबर)
आरटीओने दिलेल्या माहितीनुसार, विविध विभागांत झालेली कारवाई खालीलप्रमाणे आहे.
शहर/परिसर एकूण कारवाई रॅपिडो ओला उबर
ठाणे ८२ ५९ १५ ०८
बोरिवली ०८ ०२ ०२ ०४
वसई ११ ०४ ०७ ०३
एकूण १०१ ६५ २४ १५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

