भिवंडीत रणधुमाळी सुरू

भिवंडीत रणधुमाळी सुरू

Published on

संजय भोईर : सकाळ वृत्तसेवा
भिवंडी, ता. १७ : राज्यातील २९ महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांचे बिगुल वाजले असून, त्यात भिवंडी-निजामपूर शहर महापालिकेचाही समावेश आहे. २०२२ मध्ये पालिकेतील लोकप्रतिनिधींची सत्ता बरखास्त झाल्यानंतर तब्बल साडेतीन वर्षांनी या निवडणुका होत असल्याने सर्वच राजकीय पक्षांमध्ये तसेच नव्या नेतृत्वासाठी उत्सुक असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी चुरस निर्माण झाली आहे.
२०१७ च्या निवडणुकीत राज्यभरात काँग्रेसची पीछेहाट होत असतानाही भिवंडीत काँग्रेसने ९० पैकी ४७ जागा जिंकत एकहाती बहुमत मिळवले होते. त्या वेळी भाजपचे १९, शिवसेनेचे १२, समाजवादी पक्षाचे दोन, कोणार्क विकास आघाडीचे चार, आरपीआय (एकतावादी) चार आणि अपक्ष दोन नगरसेवक निवडून आले होते. मात्र, सावध भूमिका घेत काँग्रेसने महाराष्ट्रात महाविकास आघाडी स्थापन होण्यापूर्वीच भिवंडीत शिवसेनेसोबत आघाडी करून महापौर व उपमहापौर निवडून आणले होते.
अडीच वर्षांचा कार्यकाळ संपत असताना काँग्रेसमधील १८ नगरसेवकांनी इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली बंडखोरी करत अवघ्या चार नगरसेवक असलेल्या कोणार्क विकास आघाडीला पाठिंबा दिला. या बंडखोरीमुळे काँग्रेस सत्तेबाहेर फेकली गेली. त्यानंतर राज्यातील राजकीय उलथापालथीत शिवसेना फुटीनंतर भिवंडीतील सर्व १२ नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटाची वाट धरली.
एकूणच येत्या सार्वत्रिक निवडणुकीत नेमके चित्र काय असेल, हे पुढील महिनाभरात स्पष्ट होणार असले तरी भाजप, काँग्रेस आणि समाजवादी पक्ष हे प्रमुख दावेदार म्हणून पुढे येऊ शकतात, असे संकेत आहेत. भाजप-शिंदे गट युती होणार का आणि महाविकास आघाडीचे अस्तित्व राहणार का, हे प्रश्न मात्र अद्याप अनुत्तरित आहेत.

समाजवादी बॅकफूटवर
समाजवादी पक्षाने २०१९ मध्ये रईस शेख यांच्या विजयामुळे संघटनात्मक बांधणी मजबूत केली होती. मात्र २०२४मध्ये पुन्हा रईस शेख विजयी झाल्यानंतर पक्षप्रमुख अबू आझमी आणि रईस शेख यांच्यात वितुष्ट निर्माण झाले. परिणामी, शहरात पक्ष दोन गटांत विभागला गेला असून, समाजवादी पक्ष पुन्हा बॅकफूटवर गेल्याचे चित्र आहे.

भाजपमध्ये उमेदवारीसाठी कसरत
काँग्रेसकडे पाहिले तर शहरातील नेतृत्व कणखर नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये अपेक्षित जोश निर्माण होत नसल्याचे दिसते. त्यामुळे मागील निवडणुकीसारखी कामगिरी काँग्रेस करू शकेल का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. भाजपमध्येही हे सर्व काही आलबेल नाही. माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचा पराभव आणि आमदार महेश चौघुले यांचा हॅट्रिक विजय यामुळे शहर भाजपवर आमदार चौघुले यांचे वर्चस्व वाढले आहे. त्यामुळे उमेदवारीच्या वेळी विद्यमान नगरसेवकांसह इच्छुकांमध्ये नाराजीची शक्यता आहे. भाजपमध्ये उमेदवारीसाठी चांगलीच कसरत करावी लागणार आहे.

ठाकरे गटाची पाटी कोरी
एकत्रित शिवसेनेतून निवडून आलेले सर्व १२ नगरसेवक शिंदे गटात गेल्याने ठाकरे गटाची शहरात पाटी कोरी झाली आहे. शिवसेना परंपरेने कामतघर, भादवड आणि टेमघर परिसरात प्रभावी राहिली असून, या भागांत कोण आव्हान उभे करतो, हे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गट किती यश मिळवेल, हे सांगणे सध्या कठीण आहे.

राष्ट्रवादीत १८ जागांवर लक्ष
दरम्यान, विद्यमान खासदार सुरेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे शहरातील अस्तित्व काय राहणार, हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. काँग्रेसमधून बंडखोरी केलेले १८ नगरसेवक राष्ट्रवादीत दाखल झाले होते; मात्र त्यांना सहा वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास अपात्र ठरवण्यात आले आहे. त्यामुळे त्या १८ जागांवर कोणते नवे चेहरे आणि कोणत्या पक्षातून समोर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महानगरपालिका माहिती
एकूण प्रभाग : २३
एकूण सदस्य : ९०
मतदारसंख्या :
पुरुष – ३,८०,६२३
स्त्रिया – २,८८,०९७
इतर – ३१३
एकूण – ६,६९,०३३

Marathi News Esakal
www.esakal.com