भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
अंबरनाथमध्ये निवडणुकीआधीच तणावाचे वातावरण
अंबरनाथ, ता. १७ (वार्ताहर) : नगरपालिकेची निवडणूक अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली असताना भाजपचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर अज्ञातांकडून गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी (ता. १७) घडली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून या घटनेमुळे निवडणुकीआधीच शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अंबरनाथ पश्चिमेतील नवीन भेंडी पाडा परिसरात बुधवारी रात्री १ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पवन वाळेकर हे शंकर मंदिराजवळील कमानीशेजारी असणाऱ्या आपल्या भूपती ट्रेडर या खासगी कार्यालयात कार्यकर्त्यांसोबत बसले असतानाच दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी त्यांच्या कार्यालयाच्या दिशेने चार राउंड फायर केले. या गोळ्या कार्यालयाच्या काचेवर लागल्या असून संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी काच फुटल्यामुळे कार्यालयातील एक कर्मचारी जखमी झाल्याची माहिती पोलिस उपआयुक्त सचिन गोरे यांनी दिली. गोळीबारानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून प्राथमिक तपासात दहशत माजवण्याच्या उद्देशाने हा गोळीबार करण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस व फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या गुन्ह्याच्या तपासासाठी तीन विशेष पथके नेमण्यात आली आहेत. ठाणे गुन्हे शाखाही या प्रकरणाचा तपास करीत आहे.
पोलिस ठाण्यात ठिय्या
विशेष म्हणजे, बुधवारी अंबरनाथमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर असताना हा प्रकार घडल्याने चर्चांना उधाण आले आहे. शहरात कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने सुमारे ८०० पोलिस कर्मचारी, ११० अधिकारी, ‘एसआरपीएफ’ची दोन पथके आणि ४५० होमगार्डचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याची माहिती उपआयुक्त गोरे यांनी दिली. दरम्यान, पोलिसांकडून तक्रार नोंदवण्यात दिरंगाई होत असल्याचा आरोप करीत माजी नगराध्यक्ष गुलाबराव करंजुळे पाटील आणि माजी आमदार नरेंद्र पवार यांनी कार्यकर्त्यांसह अंबरनाथ पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले.
पोलिस उपयुक्तांना निवेदन
निष्पक्ष चौकशीची मागणी
पवन वाळेकर यांच्या कार्यालयावरील गोळीबाराच्या घटनेची निष्पक्ष चौकशी करून आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली असून, यासंदर्भात परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांना निवेदन देण्यात आले आहे. या शिष्टमंडळात शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, अंबरनाथ शहरप्रमुख अरविंद वाळेकर, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, माजी नगराध्यक्ष मनीषा वाळेकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

