बदलापुरात पहाटे घराला आग

बदलापुरात पहाटे घराला आग

Published on

बदलापूर, ता. १७ (बातमीदार) : पूर्वेतील दत्तवाडी परिसरातील हेरंभ व्हिला सोसायटीमध्ये मंगळवारी (ता. १७) पहाटे ५.४३ वाजता तळमजल्यावरील एका फ्लॅटमध्ये आग लागल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची वाहने व अधिकारी-कर्मचारी तातडीने घटनास्थळी रवाना झाले. मात्र, दत्तवाडी येथील मुख्य प्रवेशद्वारापासून संबंधित इमारतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुतर्फा वाहने बेकायदा उभी असल्याने अग्निशमन वाहनांना घटनास्थळी पोहोचण्यात अडचणींचा सामना करावा लागला.
तळमजल्यावर राहणारे चंबवणे हे कटलरी व्यवसाय करतात. त्यांनी घरामध्ये मोठ्या प्रमाणात कटलरीचे साहित्य प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये गोदामाप्रमाणे साठवून ठेवले होते. या साहित्याला आग लागल्याने प्रचंड धूर निर्माण झाला, त्यामुळे घरात प्रवेश करणे अत्यंत धोकादायक ठरले. अग्निशमन कर्मचाऱ्यांनी हॉलची ग्रील तोडून; तसेच काचा फोडून घरात प्रवेश करून आग आटोक्यात आणली. आगीत कटलरीच्या साहित्याचे मोठे नुकसान झाले. बेकायदा पार्किंगमुळे आपत्कालीन सेवांना होणाऱ्या अडथळ्याबाबत नागरिकांनी गंभीर दखल घेण्याची गरज असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

Marathi News Esakal
www.esakal.com