एकीकडे इच्छुकांची अर्जासाठी झुंबड

एकीकडे इच्छुकांची अर्जासाठी झुंबड

Published on

इच्छुकांची अर्जांसाठी झुंबड
ठाण्यात पालिका निवडणुकीची रणधुमाळी
(सकाळ वृत्तसेवा)
ठाणे, ता. १८ : राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजवल्यानंतर ठाण्यात राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. शहरातील सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी इच्छुकांचे अर्ज भरून घेण्यास आणि त्यांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली असून, यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

भाजपची आघाडी, राष्ट्रवादीचे दोन्ही गटही सज्ज
निवडणूक प्रक्रियेत भारतीय जनता पक्षाने सध्या आघाडी घेतली आहे. भाजपकडे आतापर्यंत तब्बल ४१६ इच्छुकांनी आपले परिचय पत्र (अर्ज) सादर केले आहेत. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही मोठी चुरस पाहायला मिळत आहे. अजित पवार गटाकडे ४०० हून अधिक अर्ज प्राप्त झाले असून, महायुतीत सन्मानजनक जागा न मिळाल्यास स्वबळावर लढण्याचा इशाराही या गटाने दिला आहे. तर, राष्ट्रवादी शरद पवार गटातूनही ४०० इच्छुक निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झाले आहेत.

शिंदे गट आणि काँग्रेसची स्थिती
शिवसेना (शिंदे गट) : टेंभी नाका येथील आनंद आश्रमात बुधवारपासून अर्ज वितरणास सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी सायंकाळी ५ वाजेपर्यंत २२२ अर्जांचे वितरण झाले. अर्ज घेणाऱ्यांच्या रांगेत आजी-माजी नगरसेवकांसह अनेक नवीन चेहरे, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांची मोठी संख्या दिसून आली. विशेष म्हणजे, २००७ पासून पक्षाचे काम करणारे निष्ठावंत कार्यकर्तेही या वेळी उमेदवारी मिळेल, या आशेने रांगेत उभे होते, तर ठाण्यात आपले अस्तित्व टिकवण्यासाठी काँग्रेसनेही कंबर कसली आहे. जिल्हाध्यक्ष ॲड. विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत १५० इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. या उमेदवारांच्या मुलाखती काँग्रेसची संसदीय समिती मुख्य कार्यालयात घेत आहे.

‘आता तरी तिकीट मिळणार का?’
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून इच्छुकांमध्ये ‘तिकीट’ मिळवण्याबाबत मोठी उत्सुकता आणि धाकधूक आहे. अनेक वर्षांपासून पक्षाचे काम करणारे कार्यकर्ते आता पक्ष आपली दखल घेईल का? असा सवाल उपस्थित करत आहेत. पक्षांनी प्रभागनिहाय मोर्चेबांधणी सुरू केल्यामुळे इच्छुकांनी आपापल्या नेत्यांकडे फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com