प्रभादेवीत रंगणार आगरी महोत्सव
प्रभादेवीत रंगणार आगरी महोत्सव
कबड्डी स्पर्धेत बोकड-कोंबड्यांची अनोखी भेट
प्रभादेवी, ता. १८ (बातमीदार) ः प्रभादेवी येथे आगरी सेवा संघाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या आगरी महोत्सवात कबड्डी स्पर्धेला यंदा आगळेवेगळे स्वरूप देण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेत्या संघांना पारंपरिक चषक व रोख बक्षिसांसह बोकड आणि कोंबड्यांची अनोखी भेट दिली जाणार असल्याने क्रीडाप्रेमी आणि नागरिकांमध्ये विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे.
मुंबईचा आद्य नागरिक म्हणून कोळी आणि आगरी समाजाकडे पाहिले जाते. आजही आगरी समाजाने आपली परंपरा, संस्कृती आणि सामाजिक एकोपा जपला असून, याच परंपरेचे दर्शन घडवण्यासाठी प्रभादेवीत १८ ते २५ डिसेंबरदरम्यान आगरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आगरी सेवा संघाच्या वतीने मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने प्रभादेवी येथील दि. बा. पाटील क्रीडा नगरी, राजाभाऊ साळवी उद्यानात २१ डिसेंबरपर्यंत ‘ब’ गटाच्या कबड्डी स्पर्धा खेळविण्यात येणार आहेत. या स्पर्धांमधून क्रीडाप्रेमींना कबड्डीचा थरार अनुभवता येणार आहे. या स्पर्धेतील विजेत्या संघांना बोकड, कोंबड्या तसेच उकडलेली अंडी अशी पारंपरिक भेट देण्यात येणार असल्याने परिसरात या स्पर्धेबाबत मोठी चर्चा आहे. ग्रामीण आणि पारंपरिक संस्कृतीचे प्रतीक असलेल्या या भेटीमुळे महोत्सवाला वेगळाच रंग येणार आहे.
आगरी महोत्सवाच्या निमित्ताने समाजबांधवांची भव्य शोभायात्रा काढण्यात येणार असून, समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना ‘समाजभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शालांत परीक्षेपासून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरवही करण्यात येणार आहे. प्रभादेवीतील आगरी सेवा संघ दरवर्षी क्रीडा, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून समाजाची परंपरा जपण्याचे कार्य करत असल्याचे संघाचे अध्यक्ष पद्माकर म्हात्रे यांनी सांगितले.

