बंडखोरीच्या चिंतेने घेरले
बंडखोरीच्या चिंतेने घेरले
इच्छुकांच्या अर्जासोबत घोषणापत्र; शिवसेना शिंदे गटाची शक्कल
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १८ : महायुतीत जागावाटपाच्या चर्चेत आपला पत्ता कट झाल्यास बंडखोरी करण्याच्या तयारीत असलेल्या इच्छुकांना वेसण घालण्यासाठी शिवसेना शिंदे गटाने घोषणापत्राची मात्रा लागू केली आहे. उमेदवारीसाठी अर्ज भरताना इच्छुकांना तिकीट न मिळाल्यास पक्षाशी प्रामाणिक राहून जो उमेदवार निवडला जाईल, त्याला पूर्ण सहकार्य करण्याची लेखी ‘प्रतीज्ञा’ घेतली जाणार आहे. इच्छुकांनी उमेदवारीसाठी अर्ज भररतानाच हे घोषणापत्र देणे बंधनकारक असून, त्यांनंतरच त्यांच्या मुलाखती घेऊन पुढील विचार केला जाणार आहे. त्यामुळे अर्ज भरताना इच्छुकांनाही शंभरवेळा विचार करावा लागणार आहे.
ठाणे महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून, बुधवारपासून सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यालयांमध्ये उमेदवारी अर्ज मिळवण्यासाठी झुंबड उडाल्याचे पाहायला मिळाले. उमेदवारी अर्ज भरताना आवश्यक असणाऱ्या सर्व कागदपत्रांची यादी यासोबत देण्यात आली आहे. टेंभीनाका येथील आनंदाश्रमातही शिवसेना शिंदे गटाने अर्ज वितरणाला सुरुवात केली. पहिल्याच दिवशी साडेचारशेहून अधिक अर्ज इच्छुक घेऊन गेले, पण या अर्जासोबत जोडण्यात आलेल्या घोषणापत्राने सर्वच चक्रावून गेले. मी शिवसेनेच्या तत्त्व आणि शिस्तीचे पालन करण्याची, पक्षहितासाठी कार्य करण्याची प्रतीक्षा करतो. तसेच पक्ष जो उमेदवार निश्चित करे, पक्षआदेश मानून उमेदवाराला प्रामाणिकपणे निवडून आणण्यासाठी कटिबद्ध असेल, असे या घोषणापत्रात नमूद करण्यात आले आहे.
इच्छुकांची झोप उडाली
घोषणापत्राने इच्छुकांची झोप उडवली असल्याची चर्चा आहे. इच्छुकांमध्ये माजी नगरसेवकांंनी पुन्हा उमेदवारीसाठी अर्ज घेतले आहेत, तर त्यांच्याच प्रभागांमध्ये संधी मिळावी यासाठी कार्यरत असेलेल्या इच्छुकांनीही अर्ज घेतले आहेत. इतर पक्षांतून उमेदवारीच्या आशेने आलेल्या पदाधिकाऱ्यांचाही यामध्ये समावेश आहे. उमेदवारी मिळेल या आशेने गेली काही वर्षे प्रभागांमध्ये विविध उपक्रम राबवून त्यांनी मोठ्या प्रमाणात पदरमोड केली होती, पण महायुतीच्या चर्चेमुळे सर्वप्रथम विद्यमान आणि मर्जीतील दिग्गजांनाच तिकीट मिळण्याची शक्यता आहे. नगरसेवक बनण्याच्या स्वप्नांवर यावेळीही पाणी फेरले जाणार का ही चिंता त्यांना सतावत आहे.
बंडखोरी अटळ
वास्तविक ठाण्यात शिवसेना शिंदे गटाने २०१७ प्रमाणे स्वबळाची तयारी केली होती. ठाण्यात ताकद वाढावी यासाठी भाजपच्या प्रभागांमध्येही इच्छुकांना बळ देण्यात आले होते. त्यानुसार नौपाडा, मानपाडा, घोडबंदर पट्ट्यात इच्छुक कामाला लागले होते, पण पक्षाकडून तिकीट मिळाले नाही, तर सर्वाधिक बंडखोरी शिवसेना शिंदे गटात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

