डहाणू शहरात वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न
डहाणूला वाहतूककोंडीचा विळखा
रेल्वे स्थानक परिसराची स्थिती गंभीर; अनधिकृत पार्किंगमुळे पादचाऱ्यांची कसरत
कासा, ता. १८ (बातमीदार) : डहाणू नगर परिषद हद्दीत गेल्या अनेक वर्षांपासून वाहतुकीचा प्रश्न उग्र बनला असून, सततच्या कोंडीमुळे डहाणूकर अक्षरशः त्रस्त झाले आहेत. रेल्वे स्थानक परिसर, मुख्य बाजारपेठ आणि शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात वाहतुकीचा बट्याबोळ उडाला असून, प्रशासनाचे याकडे सपशेल दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
रेल्वे स्थानकासमोरच रिक्षा स्टँडसह खासगी वाहने रस्त्याच्या मध्यभागी उभी केली जातात. फोर्ट, चिखला, नरपड भागात जाणाऱ्या रिक्षांच्या रांगांमुळे रस्ता अरुंद होतो. मुख्य रस्त्यालगत भाजीपाला आणि फळविक्रेत्यांच्या हातगाड्यांमुळे उरलासुरला रस्ताही अडवला जातो. खरेदीसाठी येणारे लोक आपली वाहने रस्त्यावरच पार्क करत असल्याने वाहतुकीचा प्रवाह पूर्णपणे खोळंबतो. डहाणूची ७५ हजारांहून अधिक लोकसंख्या आणि ग्रामीण भागातून येणाऱ्या प्रवाशांमुळे रेल्वे स्थानक परिसरावर प्रचंड ताण पडतो. शाळा-महाविद्यालये सुटण्याच्या वेळी आणि लोकल ट्रेनच्या वेळी ही परिस्थिती अधिक बिकट होते.
याच मार्गावर डहाणू पोलिस ठाणे आणि पुढे अदाणी थर्मल पॉवरकडे जाणारा रस्ता आहे. एखादी आग किंवा अन्य आपत्कालीन घटना घडल्यास अरुंद रस्त्यामुळे अग्निशामक दल किंवा रुग्णवाहिका वेळेत पोहोचू शकणार नाही, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. शहरातील वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. विशेषतः वृद्ध आणि शाळकरी मुलांना या गर्दीतून मार्ग काढणे कठीण जाते. प्रशासनाने केवळ फलक न लावता प्रत्यक्ष दंडात्मक कारवाई करून पार्किंगची शिस्त लावावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.
-------------
प्रशासकीय उपाययोजना कागदावरच
वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नगर परिषद व पोलिसांनी अनेक ठिकाणी ''नो-पार्किंग''चे फलक लावले आहेत. जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी स्तरावर बैठका घेऊन उपाययोजना सुचवल्या गेल्या, मात्र त्यांची ठोस अंमलबजावणी होताना दिसत नाही. ''नो-पार्किंग''च्या फलकाखालीच वाहने उभी राहत असल्याने नियमांची पायमल्ली होताना दिसते.
------------------
डहाणू नगर परिषदेच्या वतीने अनेक वेळा कार्यवाही करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र काही दिवसांनी पुन्हा तीच परिस्थिती निर्माण होते. पुढील काळात हा रस्ता रुंद होणार असल्याने हा प्रश्न काही अंशी सुटू शकतो. सध्या आमच्या पातळीवर नो-पार्किंग झोनची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
- अक्षय गुडदे, मुख्याधिकारी, डहाणू नगर परिषद
------------------
डहाणू रेल्वे स्थानक परिसर नेहमीच गजबजलेला असतो. ट्रेन ये-जा करत असताना प्रचंड गर्दी उसळते. अशावेळी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे डहाणू नगर परिषदेने तातडीने आणि ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.
- अमित शेट्टी, मनसे डहाणू तालुका प्रमुख
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

