थोडक्‍यात बातम्या नवी मुंबई

थोडक्‍यात बातम्या नवी मुंबई

Published on

ऐरोलीमध्ये कोल्हापुरवासीयांचा कौटुंबिक स्नेहसोहळा
वाशी, ता. १८ (बातमीदार) ः नोकरी, व्यवसाय व विविध कारणांमुळे नवी मुंबईत स्थायिक झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी कोल्हापूरकर रहिवाशी विकास सेवा संस्था, नवी मुंबई यांच्या वतीने वार्षिक कौटुंबिक स्नेह–मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा स्नेहसोहळा रविवार, ता. २१ रोजी ऐरोली सेक्टर ८ येथील सभागृहात उत्साहात पार पडणार आहे.
कोल्हापूरकर रहिवाशी विकास सेवा संस्था ही गेल्या चार वर्षांपासून नवी मुंबई परिसरात सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, कला व क्रीडा क्षेत्रात सक्रिय कार्यरत आहे. नवी मुंबईत वास्तव्यास असलेल्या कोल्हापूरवासीयांना एकत्र आणणे, त्यांच्यात आपुलकी, सांस्कृतिक नाते व सामाजिक बांधिलकी जपणे हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे. या उद्देशातून संस्थेतर्फे दरवर्षी शाहू महाराज जयंती, दसरा मेळावा, कौटुंबिक स्नेह–मेळावा असे विविध उपक्रम सातत्याने राबविले जातात. संस्थेच्या वतीने कोल्हापूरवासीयांच्या कला, क्रीडा, शैक्षणिक तसेच नाविन्यपूर्ण गुणांना प्रोत्साहन देण्यात येते. नवी मुंबईतील ज्येष्ठ नागरिकांसाठी वॉकेथॉन स्पर्धा, महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी महिला दिन सोहळा, कोल्हापूर जिल्ह्यातील मागास भागातील जिल्हा परिषद शाळांमधील पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, असे उपक्रम संस्थेने यशस्वीपणे राबविले आहेत. तसेच गणेशोत्सव काळात कोल्हापूर, कागल, राधानगरी, गारगोटी, गडहिंग्लज, आजरा, चंदगड परिसरातील नागरिकांसाठी मोफत बस सेवा व दिवाळीत अत्यल्प दरात आकाशकंदील वाटप करण्यात येते. भविष्यात दवाखान्यातील कठीण प्रसंगी कोल्हापूरवासीयांच्या मदतीला उभे राहण्याचा संकल्प संस्थेने केला आहे. यासोबतच नवी मुंबईत कोल्हापूर निवासिनी श्री अंबाबाई व कुलदैवत श्री ज्योतिबा (केदारनाथ) यांचे भव्य मंदिर तसेच कोल्हापूरवासीयांसाठी हक्काचे ‘कोल्हापुर भवन’ उभारण्याचा मानस संस्थेने व्यक्त केला आहे. या स्नेहसोहळ्याबाबत अधिक माहितीसाठी संस्थेचे पदाधिकारी प्रकाश तेजम (मो. ९९३०२९१३१७) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे......
.............
निवडणुकीच्या कामकाजाचा आयुक्तांकडून आढावा
नेरूळ, ता. १८ (बातमीदार) ः राज्य निवडणूक आयोगामार्फत नवी मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ जाहीर करण्यात आली असून मतदानाची तारीख १५ जानेवारी २०२६ निश्चित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी निवडणूक प्रक्रियेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी महापालिका, पोलिस प्रशासन तसेच इतर संबंधित प्राधिकरणांच्या अधिकाऱ्यांची विशेष बैठक घेतली.
या बैठकीत निवडणूक आयोगामार्फत नियुक्त उपजिल्हाधिकारी संवर्गातील निवडणूक निर्णय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार संवर्गातील सहाय्यक निवडणूक अधिकारी यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. निवडणूक कामकाज निष्पक्ष, पारदर्शक व शांततेत पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वय राखून सामूहिक भावनेने काम करावे, असे स्पष्ट निर्देश आयुक्त डॉ. शिंदे यांनी यावेळी दिले. निवडणूक प्रक्रियेत आदर्श आचारसंहिता, मतदार यादी अद्ययावत करणे, मतदान केंद्रांची तयारी, सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियोजन, कायदा व सुव्यवस्था, तसेच निवडणुकीदरम्यान उद्भवणाऱ्या संभाव्य अडचणींवर तत्काळ उपाययोजना याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रत्येक विभागाने आपापल्या जबाबदाऱ्या वेळेत व काटेकोरपणे पार पाडाव्यात, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त सुनील पवार व डॉ. राहुल गेठे, सहायक पोलिस आयुक्त संजय येनपुरे, नवी मुंबई महापालिका निवडणूक विभागाचे उपआयुक्त भागवत डोईफोडे यांच्यासह विविध प्राधिकरणांचे अधिकारी उपस्थित होते. आगामी निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज असून, मतदारांना निर्भय व मुक्त वातावरणात मतदान करता येईल, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com