मनसे - ठाकरे गटाची संयुक्त व्यूहरचना
मनसे-ठाकरे गटाची संयुक्त व्यूहरचना
कल्याण-डोंबिवलीतील जागांसाठी ३५चा आकडा चर्चेत
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १८ ः कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि ठाकरे गट यांच्यातील जवळीक आता चर्चेत आली आहे. प्रभागनिहाय ताकद, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि सामायिक विचारधारेच्या जोरावर कल्याण-डोंबिवलीत दोन्ही पक्ष लढण्याची रणनिती आखली असून, मनसे आणि ठाकरे गटाने ३५हून अधिक नगरसेवक निवडून आणण्याचे लक्ष्य ठेवत संयुक्त व्यूहरचना तयार केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गट आणि मनसेचे नेते एकत्र आल्याने ‘दुग्धशर्करा योग’ असल्याचे वातावरण कार्यकर्त्यांमध्ये आहे. दोन्ही पक्षांचे बहुतांश कार्यकर्ते हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतील निष्ठावान कार्यकर्ते असल्याने विचारधारात्मक दरी नसल्याचा दावा केला जात आहे. राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर शिवसेनेतील एक वर्ग त्यांच्या पाठीशी गेला, तर दुसरा गट शिवसेनेतच राहिला. त्यामुळे आजही स्थानिक पातळीवर ‘आपण एकाच विचाराचे’ असल्याची भावना कायम असल्याचे सांगितले जाते.
प्रभागनिहाय ताकद कुठे आहे, याची स्पष्ट जाणीव दोन्ही पक्षांच्या स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना आहे. त्यामुळे जागावाटप करताना फारसा तिढा निर्माण होणार नाही, असा दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे. कल्याण पश्चिमेत ठाकरे गटाचा प्रभाव अधिक आहे, तर कल्याण पूर्व, डोंबिवली शहर आणि कल्याण ग्रामीण पट्ट्यात प्रभागनिहाय दोन्ही पक्षांची ताकद विभागलेली आहे. या गणितानुसार सामंजस्याने उमेदवार निश्चित करून साधारण ३५ ते ४० नगरसेवक निवडून आणण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
महायुतीत कोणताही बेबनाव न होता शिंदे गट आणि भाजप एकत्रितपणे निवडणूक लढवतील, तर ठाकरे गट-मनसेतील काही इच्छुक उमेदवार पक्षांतर करू शकतात, अशी शक्यताही स्थानिक नेते व्यक्त करत आहेत, मात्र असे झाले, तरी विजयी उमेदवारांची एकूण संख्या किती वाढते किंवा घटते, यावर अंतिम राजकीय गणित अवलंबून असेल, असे ठाकरे गट-मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
शिंदे गट-भाजपमधील माजी नगरसेवकांमध्ये नाराजी
दरम्यान, कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक शिंदे गट-भाजप महायुती म्हणून लढण्याचे संकेत वरिष्ठ पातळीवरून मिळत असले, तरी स्थानिक पातळीवर मात्र असंतोषाची धग जाणवत आहे. अन्य पक्षांतील नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना आपल्या पक्षात घेतल्याने शिंदे गट-भाजपमधील स्थानिक पदाधिकारी, माजी नगरसेवकांमध्ये नाराजी असल्याचे चित्र आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

