उल्हासनगरात काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध,
उल्हासनगरात काँग्रेसचा जाहीरनामा
निवडणुकीसाठी कंबर कसली ः उमेदवारांच्या मुलाखती
उल्हासनगर, ता. १८ (बातमीदार) ः निवडणूक आयोगाने निवडणुका जाहीर करताच काँग्रेसने कंबर कसली असून, सोमवारी (ता. १६) जाहीरनामा प्रसिद्ध केला. जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांच्या पुढाकाराने काँग्रेसचे प्रभारी नवीन सिंह, प्रदेश सचिव कुलदीप ऐलसिंहनी, माजी नगरसेविका अंजली साळवे, काँग्रेस सेवादल अध्यक्ष शंकर आहूजा, महिलाध्यक्ष मनीषा महाकाळे, ब्लॉकध्यक्ष किशोर धडके, नानिक आहुजा, सुनील बहरानी यांच्या हस्ते जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला.
राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर उल्हासनगर शहरात काँग्रेसने निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली असून, इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे. या माध्यमातून सक्षम, संघटनात्मक बांधिलकी असलेले आणि जनतेशी थेट संपर्क असलेले उमेदवार निवडीवर काँग्रेस नेतृत्वाचा भर असल्याचे नवीन सिंह, रोहित साळवे यांनी सांगितले. एकूणच महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष आक्रमक आणि नियोजनबद्ध पद्धतीने मैदानात उतरल्याचे चित्र आहे. जाहीरनाम्यातील लोकाभिमुख आश्वासने, उमेदवार निवडीची प्रक्रिया आणि संभाव्य आघाडी यामुळे आगामी निवडणुकीत काँग्रेसची भूमिका निर्णायक ठरणार का, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
मालमत्तामाफी, पाणीपुरवठ्यासह अनेक आश्वासने
या जाहीरनाम्यात नागरिकांच्या दैनंदिन अडचणींना प्राधान्य देण्यात आले असून, शहराच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण आश्वासने देण्यात आली आहेत. यानुसार ५०० चौरस फूट आणि त्यापेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या घरांना मालमत्ता करमाफी देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे मध्यमवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
याशिवाय सुरळीत व पुरेसा पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. आरोग्य सुविधांच्या बाबतीतही काँग्रेसने ठोस भूमिका घेतली असून, शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्रे सक्षम करणे, रुग्णालयांमध्ये आवश्यक सुविधा वाढवणे आणि परवडणाऱ्या दरात आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.
सर्व जागांवर उमेदवार देणार
उल्हासनगर महापालिकेच्या एकूण २० प्रभागांमध्ये काँग्रेस पक्ष सर्व जागांवर उमेदवार देणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले, मात्र वरिष्ठ नेतृत्वाच्या आदेशानुसार महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांशी चर्चा करून निवडणुकीत आघाडी करण्याची तयारीही काँग्रेसने दर्शवली आहे. त्यामुळे आगामी काळात उल्हासनगरच्या राजकारणात महाविकास आघाडीची एकत्रित ताकद पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

