सिग्नल यंत्रणा अनेक दिवसांपासून बंद
महामार्गावरील सिग्नल यंत्रणा अनेक दिवसांपासून बंद
खोदकामाचे परिणाम, वाहतूक पोलिसांची कसरत
दिनेश गोगी ः सकाळ वृत्तसेवा
उल्हासनगर, ता. १७ ः कल्याण-बदलापूर या महामार्गावरील उल्हासनगरातील सिग्नल यंत्रणा अनेक दिवसांपासून बंद आहे. यामुळे अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला असून, कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांना तारेवरची कसरत करण्याची वेळ आली आहे.
कल्याण-बदलापूर या महामार्गावर छत्रपती शिवाजी महाराज चौक, १७ सेक्शन चौक, फॉरवर्ड लाइन चौक या ठिकाणी असून, जवळपास तीन वर्षांपूर्वी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीकांत धरणे यांच्या प्रयत्नाने सिग्नल यंत्रणा कार्यान्वित झाली होती. आजघडीला महामार्ग उंच करण्याचे काम सुरू असून, त्यासाठी सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर दुसरा काँक्रीटचा उंच थर टाकण्यात येत आहे. हे काम शांतीनगर ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत केले जात आहे. त्यामुळे सिग्नल यंत्रणा बंद पडलेली आहे. यामुळे वाहतूक कोंडीसह अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
वाहतूक कोंडी
या कामामुळे सिग्नल यंत्रणा बंद पडल्याने १७ सेक्शन चौकात कमालीची वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. विशेषतः कल्याणकडून उल्हासनगरमार्गे अंबरनाथ बदलापूरकडे जाणाऱ्या वाहनांना मार्गस्थ होण्यासाठी कोंडीचा सामना करावा लागत आहे. यामुळे वाहतूक नियमन करताना वाहतूक पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे, मात्र रात्री ८ नंतर पोलिस नसल्याने बेशिस्त वाहनचालकांची दादागिरी डोकेदुखी ठरू लागली आहे.
काम संपताच सिग्नल यंत्रणा कार्यान्वित होणार
यासंदर्भात वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश शिरसाट यांच्याशी संपर्क साधला असता रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होत असली तरी पोलिस कर्तव्य बजावत आहेत. रस्त्याचे काम संपताच सिग्नल यंत्रणा पुन्हा कार्यान्वित केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

