विद्यार्थ्यांनी घेतला ग्रामीण जीवनशैलीचा अनुभव

विद्यार्थ्यांनी घेतला ग्रामीण जीवनशैलीचा अनुभव

Published on

विद्यार्थ्यांनी घेतला ग्रामीण जीवनशैलीचा अनुभव
कोलठण येथे सातदिवसीय श्रमसंस्कार शिबिर

मुरबाड, ता. १७ (बातमीदार) : शांताराम भाऊ घोलप कला, विज्ञान व गोटीराम भाऊ पवार वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत मुरबाड तालुक्यातील कोलठण येथे सातदिवसीय श्रमसंस्कार शिबिर घेण्यात आले. शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ग्रामीण जीवनशैलीचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली.
१० ते १६ डिसेंबर या कालावधीत झालेल्या शिबिराचा समारोप मंगळवारी (ता. १६) करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार गोटीराम भाऊ पवार उपस्थित होते. प्रमुख पाहुणे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तुकाराम ठाकरे, मुरबाड तालुका शेतकरी सहकारी संघाचे माजी अध्यक्ष दामोदर ठाकरे, नूतन विद्यालय कोलठणचे अध्यक्ष जगन आगिवले, शिवळे महाविद्यालयाच्या उपप्राचार्य गीता विशे उपस्थित होत्या. सातदिवसीय शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांनी सामाजिक सर्वेक्षण, रस्ते सुरक्षा जनजागृती, व्यसनाधीनतेविरोधी प्रबोधन, स्वच्छता अभियान आदी विविध उपक्रम राबवले. विद्यार्थ्यांनी केलेल्या सर्वेक्षणातून ग्रामस्थांनी रस्त्यांची दुरवस्था, सांडपाणी व्यवस्था आणि आरोग्य सुविधांबाबतच्या समस्या मांडल्या. या संवादातून विद्यार्थ्यांना लोकांशी कसा संवाद साधावा, सामाजिक प्रश्न कसे समजून घ्यावेत याचा मोलाचा अनुभव मिळाला. शिबिरात उत्कृष्ट नेतृत्व केल्याबद्दल गौरव साबळे व पल्लवी शिरोसे यांचा सत्कार करण्यात आला. गौरव साबळे व रिया चव्हाण यांनी शिबिरातील अनुभवांविषयी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य गीता विशे यांनी केले. सूत्रसंचालन प्राध्यापक आर. डी. वर्मा यांनी केले.

मुरबाड : तालुक्यातील कोलठण येथे शिवळे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना माजी आमदार गोटीराम पवार यांनी मार्गदर्शन केले.

Marathi News Esakal
www.esakal.com