साडेतीन वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर लोकशाहीची पुन्हा परीक्षा
महायुतीच्या गोंधळातच रणसंग्राम
भाजप-सेना-टीओके समीकरण निर्णायक ठरणार; शिवसेना घेणार ‘वेट अँड वॉच’ भूमिका?
उल्हासनगर, ता. १८ (वार्ताहर) : उल्हासनगर महानगरपालिकेच्या राजकारणाला अखेर निर्णायक वळण लागले आहे. निवडणूक आयोगाने १५ जानेवारी २०२६ रोजी उल्हासनगर महापालिकेची निवडणूक होणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. अशात, महायुतीत सध्या सुरू असलेला ताणतणाव, त्यातच टीम ओमी कलानी गटाचा वारंवार होणारा हस्तक्षेप यामुळे ही निवडणूक केवळ सत्ता बदलाची नव्हेतर जुने विरुद्ध नवे आणि युती विरुद्ध तुटी यांचा कस पाहणारी ठरणार आहे.
२०१७ च्या निवडणूक निकालांपेक्षा आजची राजकीय परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. भाजप, शिंदे गट, टीम ओमी कलानी (टीओके) आणि साई पक्ष यांच्यातील समीकरणे ही निवडणुकीची दिशा ठरवणार आहेत. शिवसेनेच्या सुमारे २५ जागा तुलनेने सुरक्षित मानल्या जातात; मात्र सिंधी समाजबहुल प्रभागांमध्ये भाजप आणि टीओके यांच्यातील संघर्ष कायम राहिला आहे.
यंदाच्या पालिका निवडणुकीत सर्वात मोठा बदल म्हणजे प्रचारासाठी मिळणारा अत्यल्प वेळ आहे. पूर्वी उमेदवारांना प्रचारासाठी सुमारे ४० दिवसांचा कालावधी दिला जात होता, मात्र यंदा तो १५ दिवसांपेक्षाही कमी केला आहे. ३ जानेवारीपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार असून, प्रत्यक्ष प्रचारासाठी अवघे १२ दिवसच उपलब्ध राहणार आहेत. यामुळे ओळखीचे, संघटनात्मक ताकद असलेले आणि थेट संपर्कात असलेले उमेदवार फायदेशीर ठरण्याची शक्यता अधिक आहे. नव्या चेहऱ्यांना संधी मिळेल की पुन्हा जुनेच चेहरे मैदान मारतील, हा मोठा प्रश्न आहे.
कलानींची रणनीती आणि भाजपसमोरील आव्हान
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर ओमी कलानी यांनी शरद पवार गटाची साथ सोडून शिंदे गटासोबत मैत्रीपूर्ण युतीचा मार्ग स्वीकारला आहे. भाजपला रोखणे हा या रणनीतीचा मुख्य उद्देश असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे, मात्र महायुतीत जागावाटप आणि नेतृत्वावरून असमंजस कायम असून, शेवटच्या क्षणी शिवसेना वेगळी भूमिका घेते का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
विरोधकांची स्थिती
राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष भरत राजवानी उर्फ गंगोत्री हे एकाकी लढतीची तयारी करत आहेत. ठाकरे गटाकडून केवळ धनंजय बोडारे यांचीच आपल्या प्रभागात ठोस ताकद दिसून येते. काँग्रेस, मनसे आणि प्रजा कृपा पार्टी स्वतंत्र उमेदवार उभे करणार असून, यंदा मोठ्या प्रमाणात अपक्ष उमेदवारही रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. हे अपक्षच अनेक प्रभागांमध्ये किंगमेकर ठरू शकतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

