कळव्यात भाजपने प्रचाराचा नारळ फोडला

कळव्यात भाजपने प्रचाराचा नारळ फोडला

Published on

कळव्यात भाजपचा एल्गार
युतीत ५० टक्के जागांची मागणी; स्वतंत्र लढण्याचेही संकेत
कळवा, ता. १८ (बातमीदार) : ठाणे महापालिका निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना युतीची वरिष्ठ स्तरावरील चर्चा अद्याप अंतिम टप्प्यात पोहोचलेली नाही. अर्ज दाखल करण्यास अवघे पाच दिवस शिल्लक असताना कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर करण्यासाठी कळव्यातील भाजपने एक पाऊल पुढे टाकले आहे. कळवा-खारेगाव आणि विटावा पट्ट्यातील चारही प्रभागांत गुरुवारी (ता. १८ ) भाजपने प्रचाराचा नारळ फोडून रणशिंग फुंकले.

कळव्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी नुकतीच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि आमदार गणेश नाईक यांची भेट घेऊन ५० टक्के जागांची आग्रही मागणी केली आहे. युती झाल्यास सन्मानजनक जागा मिळाव्यात, अन्यथा कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी स्वतंत्र लढण्याची तयारी असल्याचे पत्रच वरिष्ठांना देण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९, २३, २४ आणि २५ मध्ये भाजपने आपला प्रचार अधिकृतपणे सुरू केला आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना भाजप मंडळ अध्यक्ष चंद्रहास मोरे, कृष्णकुमार यादव, ॲड. सुदर्शन साळवी आणि मनोहर सुखदरे यांनी पक्षाची बाजू मांडली. ते म्हणाले की, गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपने शिवसेनेला खांद्याला खांदा लावून मदत केली आहे. कळवा परिसरात भाजपचे जवळपास १६ हजार नोंदणीकृत सदस्य आहेत. मागील निवडणुकीत भाजपचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते, तसेच यापूर्वी कळव्याने भाजपचे दोन उपमहापौर दिले आहेत. केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याने स्थानिक विकासकामांसाठी नागरिकांचा कल भाजपच्या बाजूने आहे.

३५ इच्छुक उमेदवार मैदानात
कळव्यातील एकूण १६ जागांसाठी भाजपमधून सध्या ३५ उमेदवार इच्छुक आहेत. युतीबाबत वरिष्ठ स्तरावर काय निर्णय होतो, याची वाट न पाहता भाजपने चारही प्रभागांत प्रचाराला सुरुवात केली आहे. ‘‘आम्हाला समान अधिकारातून ५० टक्के जागा मिळाव्यात, अन्यथा आम्ही स्वतंत्र लढण्यास सज्ज आहोत,’’ असा आक्रमक पवित्रा स्थानिक नेत्यांनी घेतला आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com