अंबरनाथमध्ये अटीतटीची लढत

अंबरनाथमध्ये अटीतटीची लढत

Published on

अंबरनाथमध्ये अटीतटीची लढत
मुख्यमंत्र्यांच्या सभेतनंतर भाजप जोमात; शिंदे गटाची ताकद पणाला

अंबरनाथ, ता. १८ (वार्ताहर) : १० वर्षांनंतर होणाऱ्या अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीत पुन्हा सत्ता स्थापनेसाठी शिंदे गटाने संपूर्ण ताकद पणाला लावली आहे; मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेनंतर भाजपही नगर परिषद काबिज करण्यासाठी जोमात कामाला लागली आहे. विकासाच्या अजेंड्यावर शिवसेना शिंदे गट, तर भ्रष्टाचाराच्या मुद्यावर भाजप मैदानात उतरल्याने ही निवडणूक अधिक रंजक आणि अटीतटीची झाली आहे. दरम्यान, प्रचाराचा धुरळा गुरुवारी रात्री शांत होणार असून, २० डिसेंबरला होणाऱ्या मतदानाच्या दिवशी अंबरनाथकर कोणाच्या बाजूने कौल देणार हे २१ डिसेंबरच्या निकालाच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे.

अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीचा धुरळा गेल्या महिनाभरापासून उधळला जात आहे. २ डिसेंबरला होणारे मतदान आता शनिवारी २० डिसेंबरला पार पडणार आहे. मुदत जास्त मिळाल्याने प्रत्येक पक्षाकडून प्रचाराचा वेग वाढला. बॅनरबाजी, सोशल मीडियावरील आक्रमक प्रचार, जाहीर सभा, रॅली तसेच घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवादाने अंबरनाथचे राजकीय वातावरण तापले आहे. गोळीबारापर्यंत प्रकरण पोहोचल्यामुळे निवडणूक अधिक आक्रमक झाली आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. विकासाचे व्हिजन मांडताना दहशतमुक्त अंबरनाथचा नारा देत त्यांनी एकप्रकारे शिवसेना शिंदे गटाला आव्हान दिले, अशी चर्चा आहे.

सभेपूर्वी भाजपमध्ये काहीशी अस्वस्थता जाणवत होती. बदलापूरच्या निवडणुकीदरम्यान भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील वाद शिगेला पोहोचला होता. तसेच काहीसे पडसाद अंबरनाथमध्येही पाहायला मिळत होते. शिंदे गटाकडून विकासकामांच्या मुद्द्यावर प्रचार होत असताना भाजपकडून भ्रष्टाचार आणि भयमुक्त अंबरनाथ हे मुद्दे पुढे केले जात होते. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते; मात्र मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर संपूर्ण चित्र बदलले. देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाने उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये नव्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. आत्मविश्वास वाढला आहे. सभेनंतर भाजपचा प्रचार अधिक आक्रमक आणि संघटित पद्धतीने सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे ही निवडणूक आणखी अटीतटीची झाली असून, दोन्ही पक्षाची ताकद पणाला लागली आहे.

नगराध्यक्षपदाची लढत चुरशीची
महिला आरक्षणामुळे अनेक दिग्गज नेत्यांना थेट मैदानात उतरता आले नसले, तरी पत्नी, सून आणि मुलींच्या माध्यमातून राजकीय ताकद कायम ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजपकडून माजी नगराध्यक्ष गुलाबराव करंजुळे पाटील यांच्या सुनेला तेजश्री करंजुळे पाटील नगराध्यक्षपदासाठी मैदानात उतरल्या आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्या पत्नी व माजी नगराध्यक्ष मनीषा वाळेकर यांचे तगडे आव्हान आहे. या दोन प्रमुख उमेदवारांमध्येचे कांटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. याशिवाय ठाकरे गटाकडून माजी उपनगराध्यक्ष व उच्चशिक्षित उमेदवार अंजली राऊत रिंगणात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)कडून सदाशिव पाटील (सदामामा) यांची सून अश्विनी पाटील, तर काँग्रेसकडून शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांच्या पत्नी नूतन पाटील यासुद्धा नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत.

शिवसेनेचा भगवा फडकणार
शिवसेना आणि अंबरनाथ हे समीकरण झाले असून, गेल्या २० वर्षांहून अधिक काळापासून येथील मतदारांनी धनुष्य बाणालाच निवडून दिले आहे. विकासाच्या मुद्यावर आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. त्यामुळे कोणी कितीही ताकद लावली तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्त्वात अंबरनाथमध्ये पुन्हा एकदा शिवसेनेचाच भगवा फडकरणार, असा ठाम विश्वास शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com