मोबाईल चोरट्यास पाठलाग करून पकडले
मोबाईल चोरट्यास पाठलाग करून पकडले
ठाणे, ता. १८ : लोकलच्या डब्यात प्रवाशाचा मोबाईल चोरून पळून जाणाऱ्या एका सराईत चोरट्याला प्रवाशांनी धाडसाने पाठलाग करून पकडले. ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एकवर ही घटना घडली. प्रकाश राम किशोर पाशी (वय २५, रा. दिवा, मूळ रा. उत्तर प्रदेश) असे या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून ४० हजार रुपयांचा मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे.
भांडुप येथे राहणारे कतीका सावंत हे बुधवारी (ता. १७) रात्री नेहमीप्रमाणे कामावरून घरी जाण्यासाठी निघाले होते. ठाणे रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक एकवर आलेली ‘ठाणे-परेल धीमी’ लोकल त्यांनी पकडली. जनरल डब्यात बसलेले असताना त्यांनी आपला मोबाईल फोन शेजारील सीटवर ठेवला होता. हीच संधी साधून चोरटा प्रकाश पाशी याने मोबाईल उचलला आणि पळ काढला. मोबाईल चोरीला गेल्याचे लक्षात येताच सावंत यांनी ‘चोर-चोर’ असा आरडाओरडा केला. डब्यातील प्रवासी प्रशांत थोरात आणि सुमीत सोनकांबळे यांनी तातडीने चोरट्याचा पाठलाग केला. याच वेळी स्थानकात साध्या वेशात तैनात असलेल्या रेल्वे पोलिसांनीही प्रवाशांच्या मदतीने चोरट्याला घेराव घालून रंगेहाथ पकडले. पकडलेल्या चोरट्याला ठाणे लोहमार्ग पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीचा मोबाईल जप्त केला असून, त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

