उद्याचे भवितव्य अंधारात
उद्याचे भवितव्य अंधारात
तलासरीत १८ हजार विद्यार्थ्यांसाठी ५०४ शिक्षक
तलासरी, ता. १८ (बातमीदार) ः गुजरात सीमेवरील दुर्गम भागातील जिल्हा परिषदेच्या १५४ शाळांमध्ये १८,९८९ विद्यार्थ्यांसाठी फक्त ५०४ शिक्षक कार्यरत आहेत. त्यामुळे स्थलांतर, भौगोलिक अडचणींबरोबर अपुऱ्या शिक्षकांच्या संख्येचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे.
तलासरी तालुक्यातील शिक्षण व्यवस्था कायमच आव्हानात्मक राहिली आहे. अशातच पंचायत समिती तलासरीअंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद शाळांची सद्यःस्थिती दर्शविणारा सविस्तर आढावा समोर आला आहे. या अहवालात तालुक्यातील १५४ जिल्हा परिषद शाळा कार्यरत असून या शाळांमध्ये १८,९८९ विद्यार्थी शिक्षण घेत असून ९,५९७ मुले, ९,३९२ मुलींचा समावेश आहे. दुर्गम आदिवासी भागातही शिक्षणाचा प्रसार व्हावा, यासाठी शिक्षण विभागामार्फत विविध शासकीय उपक्रम राबविण्यात येत आहेत; पण मोठ्या विद्यार्थी संख्येसाठी तालुक्यात फक्त ५०४ शिक्षक कार्यरत असून अभ्यासक्रम, विषयनिहाय अध्यापन, विद्यार्थी-शिक्षक प्रमाण लक्षात घेता १३८ शिक्षक तातडीने भरण्याची गरज आहे.
--------------------------
कामाचा अतिरिक्त भार
- तालुक्यात अनेक ठिकाणी एक शिक्षकी शाळा अस्तित्वात आहेत. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या जास्त असताना केवळ एकाच शिक्षकावर सर्व वर्गांचे अध्यापन करण्याची जबाबदारी आहे. अशा परिस्थितीत एकाच वेळी दोन किंवा अधिक वर्गांना शिकवावे लागत आहे.
- विद्यार्थ्यांचे वैयक्तिक लक्ष, सराव आणि समज यावर परिणाम होत असून शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शून्य शिक्षकी शाळांची नेमकी संख्या अद्याप स्पष्ट नसली तरी याबाबत माहिती संकलनाची गरज व्यक्त केली जात आहे.
-----------------------------
स्थलांतराचा परिणाम
तलासरी तालुक्यात रोजगाराच्या संधी कमी असल्यामुळे अनेक कुटुंबे कामासाठी बाहेर स्थलांतर करतात. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत असून काही विद्यार्थी शाळाबाह्य होत असल्याचे चित्र आहे. दुर्गम, सीमावर्ती भाग असताना शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
--------------------------
पायाभूत सुविधांचा अभाव
तालुक्यातील शाळांमध्ये ७३६ वर्गखोल्या उपलब्ध आहेत. बहुतांश शाळांमध्ये शौचालयांची सुविधा आहे; मात्र काही शाळांतील वर्गखोल्या जीर्ण अवस्थेत असून त्यांची दुरुस्ती आवश्यक आहे. यासाठी जिल्हास्तरावर प्रस्तावाला मंजुरी मिळालेली नाही.
----------------------------
शाळाबाह्य मुलांच्या संख्येत वाढ
शाळाबाह्य विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागामार्फत शैक्षणिक वर्षात दोन वेळा सर्वेक्षण होते. या सर्वेक्षणातून आढळणाऱ्या शाळाबाह्य विद्यार्थ्यांना जवळच्या शाळेत प्रवेश देऊन पुनर्वसन करण्यात येते, अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.
-------------------------
शाळांमधील शिक्षकांची कमतरता तसेच विद्यार्थ्यांच्या सोयीसुविधा, इमारतींबाबत सर्व अहवाल वरिष्ठ कार्यालयात पाठवले आहेत. शासनदरबारी आदेश आल्यावर आवश्यक साधनसामग्री देण्यात येईल.
- निमिष मोहिते, गट शिक्षक अधिकारी, तलासरी पंचायत समिती
----------------------------
शाळेत शिक्षकांची कमतरता आहे, याकडे शासनाने गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. जेणेकरून हजारो विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान थांबणार आहे. शिक्षकी शाळांमध्ये शिक्षकांची तातडीने भरती करणे गरजेचे आहे.
- विशाल गावित, पालक
--------------------------
तालुकानिहाय आढावा
जि.प. शाळा - १५४
मुले - - ९,५९७
मुली - - ९,३९२
शिक्षक - - ५०४
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

