दिव्यांगांच्या लढ्याला अखेर यश

दिव्यांगांच्या लढ्याला अखेर यश

Published on

दिव्यांगांच्या लढ्याला अखेर यश
मिरा-भाईंदर पालिकेकडून ‘त्या’ मुलावर उपचार
भाईंदर, ता. १८ (बातमीदार) : दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र नसल्याने पाचवर्षीय मुलावर उपचार करण्यास नकार देणाऱ्या मिरा-भाईंदर पालिकेने एक पाऊल मागे घेतले आहे. विशेष बाब, म्हणून मुलावर उपचार सुरू करावेत अशा सूचना प्रशासनाने पालिकेच्या दिव्यांग पुनर्वसन केंद्राला दिले आहेत.
भाईंदर पूर्व येथे एका पाचवर्षीय मुलाला बोलता येत नाही. ठाण्यातील जिल्हा सरकारी रुग्णालयात मुलाला स्पीच थेरपीची आवश्यकता असल्याची शिफारस जिल्हा शल्यचिकित्सकांनी केली होती. त्यानुसार भाईंदर येथील सरकारी रुग्णालयात पाठवले, मात्र उपचाराची व्यवस्था नसल्याने डॉक्टरांनी मुलाला मिरा-भाईंदर महापालिकेच्या दिव्यांग पुनर्वसन केंद्रात पाठवले, परंतु तो मुलगा दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र नसल्याचे कारण केंद्राकडून उपचारास नकार देण्यात आला होता. याबाबतचे सविस्तर वृत्त ‘सकाळ’ने प्रसिद्ध केले होते. त्यांनंतर माजी आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षानेही या प्रकरणात उडी घेतली होती, तर सामाजिक कार्यकर्ते ओमप्रकाश गडोडिया यांनीदेखील पालिका अधिकाऱ्यांची भेट घेतली होती.
--------------------------
१५ दिवसांची मुदत
मुलाकडे दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र नसले तरी विशेष बाब म्हणून नियमात तरतूद नसतानाही त्याच्यावर उपचार करण्यात यावेत, असे आदेश पालिकेने दिले आहेत. शिवाय पालकांनी मुलगा दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र १५ दिवसांत सादर करावे, असे निर्देश दिले आहेत.

Marathi News Esakal
www.esakal.com