सानपाडा बाजार संकुलास नागरिकांचा प्रतिसाद

सानपाडा बाजार संकुलास नागरिकांचा प्रतिसाद

Published on

सानपाडा बाजार संकुलास नागरिकांचा प्रतिसाद
तांत्रिक अडचणींमुळे संकुल दीर्घकाळ वापराविना
नेरूळ, ता. १८ (बातमीदार) : सानपाडा सेक्टर-४ येथील बहुप्रतीक्षित दैनंदिन बाजार संकुल अखेर नागरिकांच्या सेवेत खुले झाले असून, व्यापारी व स्थानिक रहिवाशांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे सुमारे १,०४८ चौरस मीटर क्षेत्रफळावर उभारण्यात आलेल्या या बाजार संकुलामध्ये भाजीपाला, फळे व मच्छी विक्रीसाठी सुसज्ज ओटले, स्वच्छ प्रसाधनगृहे तसेच पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांच्या कररूपी निधीतून उभारण्यात आलेल्या या प्रकल्पाचा थेट लाभ नागरिकांना मिळत आहे.
या बाजार संकुलाच्या कामास २०१८ साली सुरुवात झाली होती, मात्र विविध प्रशासकीय व तांत्रिक अडचणींमुळे हे संकुल दीर्घकाळ वापराविना राहिले. बाजाराच्या वास्तूमध्ये हवा खेळती नसल्याचे लक्षात आल्यानंतर महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या आदेशानुसार वास्तू रचनेत आवश्यक बदल करण्यात आले. त्यामुळे ओटले वापरास येण्यास विलंब झाला. त्यानंतर भाजी व फळेविक्री करणाऱ्या ५८ परवानाधारक व्यावसायिकांना ओटले वाटप करण्यात आले; मात्र स्टॉल रचनेतील तांत्रिक अडचणींमुळे हे वाटप पुन्हा थांबवावे लागले.
यानंतर आयुक्त डॉ. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ एकचे उपयुक्त सोमनाथ पोटरे आणि विभागीय अधिकारी सागर मोरे यांनी व्यावसायिकांसोबत बैठका घेऊन स्टॉल रचनेचा प्रश्न मार्गी लावला. या संपूर्ण प्रक्रियेत श्री गणेश दैनंदिन बाजार संकुल समिती, नवी मुंबई हॉकर्स अँड वर्कर्स युनियन तसेच स्थानिक पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनीही जनता दरबाराच्या माध्यमातून या विषयाला पाठिंबा दिला.
बाजार संकुल सुरू झाल्याने सानपाडा परिसराच्या विकासाला चालना मिळाली असून, व्यापारी व नागरिक दोघांनाही सुरक्षित, स्वच्छ व नियोजित बाजारपेठेची सुविधा उपलब्ध झाली आहे. स्थानिकांसाठी हा प्रकल्प दिलासादायक ठरत असून, भविष्यातील विकासासाठी नवी दिशा देणारा मानला जात आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com