गॅरेज चालकांची मनमानी

गॅरेज चालकांची मनमानी

Published on

गॅरेजचालकांची मनमानी
नेरूळ, ता. १८ (बातमीदार) : शहरातील विविध भागांत गॅरेजचालकांकडून थेट रस्त्यावरच वाहने दुरुस्त करण्याचे प्रकार वाढले असून, त्यामुळे वाहतूक कोंडीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या बेशिस्त कारभारामुळे वाहनचालक, पादचारी तसेच स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
शहरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांलगत अनेक गॅरेजचालकांनी आपला व्यवसाय थेट सार्वजनिक रस्त्यावर वाढवला आहे. कार, टेम्पो, दुचाकी अशी वाहने रस्त्यावरच उभी करून दुरुस्ती केली जात असल्याने रस्त्याची रुंदी कमी होते. परिणामी पीक अवर्समध्ये वाहतूक संथ गतीने चालते, तर काही ठिकाणी कोंडीची परिस्थिती निर्माण होते. रुग्णवाहिका, अग्निशमन दल व इतर अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना याचा फटका बसत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.
या समस्येमुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालणे कठीण झाले असून, अपघातांचा धोका वाढला आहे. विशेषतः शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गॅरेजमधून बाहेर काढलेली सुटे भाग, टायर, इंजिन ऑइल आदी साहित्य रस्त्यावरच टाकले जात असल्याने अस्वच्छतेचीही समस्या निर्माण झाली आहे.
नागरिकांनी याबाबत नवी मुंबई महानगरपालिका आणि वाहतूक पोलिसांकडे वारंवार तक्रारी केल्या असल्या तरी ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप होत आहे. नियमांनुसार सार्वजनिक रस्त्यावर वाहन दुरुस्ती करण्यास मनाई असताना प्रत्यक्षात मात्र कारवाईअभावी गॅरेजचालकांची मनमानी सुरू असल्याचे चित्र आहे.
या प्रकारांवर तातडीने कारवाई करून रस्त्यावर वाहन दुरुस्ती थांबवावी, अतिक्रमण हटवावे आणि वाहतूक सुरळीत करावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे अन्यथा आंदोलनाचा इशाराही काही नागरिकांनी दिला आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com