पत्नीच्या जाचातून सुटका करा!
पत्नीच्या जाचातून सुटका करा!
ठाण्यातील ५८७ पीडित पतींची न्यायासाठी पोलिसांकडे धाव
ठाणे शहर, ता. १८ (बातमीदार) ः कौटुंबिक वादात केवळ महिलाच नव्हे, तर आता पुरुषही मोठ्या प्रमाणात भरडले जात असल्याचे चित्र ठाणे पोलिस आयुक्तालयात पाहायला मिळत आहे. मागील ११ महिन्यांत तब्बल ५८७ पतींनी पत्नी आणि सासरच्या मंडळींविरुद्ध छळाच्या तक्रारी नोंदवल्या आहेत. या सर्व तक्रारींचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी त्या पुढील कार्यवाहीसाठी ‘भरोसा’ कक्षाकडे वर्ग केल्या आहेत.
एकीकडे हुंड्यासाठी होणारा छळ रोखण्यासाठी कायदे कडक झाले असताना, दुसरीकडे सुशिक्षित समाजात पती-पत्नीमधील वादाचे स्वरूप बदलले आहे. ठाणे आयुक्तालयांतर्गत येणाऱ्या ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर या भागांतून जानेवारी ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत ५८७ तक्रार अर्ज पोलिसांकडे आले आहेत. अनेक प्रकरणांत पत्नीचे स्वातंत्र्य, वैयक्तिक जबाबदाऱ्यांची टाळाटाळ आणि सासरच्या लोकांचा हस्तक्षेप ही वादाची मुख्य कारणे समोर आली आहेत. अनेकदा पत्नी आपल्याविरोधात कायदेशीर पाऊल उचलण्यापूर्वी ‘सुरक्षा कवच’ म्हणून पती स्वतःहून तक्रार दाखल करण्यास प्राधान्य देत असल्याचे निरीक्षण पोलिसांनी नोंदवले आहे. कायद्याचा आधार घेऊन स्वतःची बाजू आधी मांडण्याकडे कल वाढला आहे.
गुन्हे विभागाकडे आलेल्या या तक्रारी आता ‘भरोसा’ कक्षाकडे पाठवण्यात आल्या आहेत. तिथे पती-पत्नी दोघांनाही बोलावून त्यांचे म्हणणे ऐकले जाते आणि शक्य तिथे समुपदेशाच्या माध्यमातून संसार वाचवण्याचा किंवा कायदेशीर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जातो.
कौटुंबिक अत्याचाराबाबत कायद्यात स्त्रियांसाठी अनेक तरतुदी असल्या तरी, कायदा कधीही एका बाजूने विचार करत नाही. म्हणूनच पती-पत्नी दोघेही स्वतःचा बचाव करण्यासाठी पोलिसांकडे धाव घेत आहेत. अर्ज करणे म्हणजे केवळ तक्रार नसून समुपदेशनाद्वारे मार्ग काढण्याचा हा एक प्रयत्न असतो.
- ॲड. साधना निंबाळकर, समुपदेशक, भरोसा कक्ष
आकडेवारी काय सांगते?
शहर/परिसर तक्रारींची संख्या
ठाणे १२०
भिवंडी ९३
कल्याण १२८
उल्हासनगर २४६
एकूण ५८७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

